12 December 2017

News Flash

दिवसभर एनर्जी टिकवून ठेवायचीये? ‘या’ गोष्टी करा

सोप्या डाएट टिप्स

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 3:53 PM

आपल्याला दिवसभरात प्रवास, घरातील कामे, ऑफीस अशा अनेक गोष्टी करायच्या असतात. त्यासाठी आपल्याकडे पुरेशी एनर्जी असणे आवश्यक असते. अंगात ताकद असेल तर सगळी कामे आपण अधिक कार्यक्षमतेने करु शकतो. पण ताकद नसेल तर मग सतत येणारा थकवा, अंगदुखी, गळून गेल्यासारखे होणे अशी लक्षणे जाणवतात. मात्र आहारात काही ठराविक बदल केल्यास शरिरातील उर्जा टिकून राहण्यास मदत होते. काय आहेत हे बदल जाणून घेऊया.

१. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी एका वेळी जास्त न खाता थोडा थोडा वेळाने खा. अशाप्रकारे विभागून खाल्ल्याने शरीरातील उर्जा जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते.

२. ऑफीसमध्ये काम करत असताना काही खाणे शक्य नसल्यास चहा/कॉफी घेण्यापेक्षा फळे आणि काकडी, गाजर, टोमॅटो यांसारख्या भाज्या धुवून कच्या खा. यामध्येही फळांच्या किंवा भाज्यांच्या फोडी करुन आणू नका. त्यामुळे त्यातील पौष्टीकता कमी होते. पूर्ण फळ किंवा भाजी खा.

३. प्रवासादरम्यान किंवा ऑफीसमध्ये आणि अगदी घरीही भूक लागली की अनेकांना बिस्कीटे किंवा खारी, टोस्ट यांसारखे पदार्थ चहासोबत किंवा नुसते खाण्याची सवय असते. मात्र यामध्ये मैद्याचा समावेश असल्याने ते आरोग्यास घातक असतात. मैदा आणि डालडा तूप हे पदार्थ आहारात पूर्ण वर्ज करावेत.

४. तुमचे काम उन्हात फिरण्याचे असेल तर जास्त घाम येतो आणि थकवा आल्यासारखे होते. अशावेळी नारळ पाणी, फळांचा ज्यूस, लिंबाचे किंवा कोकम सरबत घ्यावे. त्यामुळे तरतरी येते आणि थकवा दूर होतो. कामानिमित्त बाहेर जात असाल तर सोबत पाण्याची बाटली ठेवावी. शरीर डिहायड्रेड होऊ नये म्हणून दर दोन तासांनी किमान एक ग्लास पाणी पित रहावे.

५. खाण्या-पिण्याच्या सवयींबरोबर आपल्या झोपण्याचा सवय आणि वेळ नीट पाळावी. रात्री जास्त जागरण झाल्यास दिवसभर एनर्जी टिकत नाही. लवकर झोपून लवकर उठणे हा जुना नियम खरंच दिवसभर खूप उत्तम एनर्जी देतो.

६. दिवसभर अ‍ॅक्टिव्ह राहायचे असेल तर ब्रेकफास्ट करणे कधीही टाळू नका. सकाळी ब्रेकफास्ट करणे अत्यंत आवश्यक असते. ब्रेकफास्टमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त सेवन केल्यास दिवसभर एनर्जी चांगली टिकेल.

७. जंक फुडच्या सेवनाने लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार उद्भवू शकतात, त्यामुळे आपली एनर्जी लेव्हल टिकून ठेवायची असेल तर जंक फूड सेवन करणे टाळावे.

First Published on October 4, 2017 3:53 pm

Web Title: important diet tips to become energetic for whole day