‘दिवाळी’ हा सर्वाचा प्रिय सण. यानिमित्ताने गेले कित्येक महिने मुखपट्टीच्या मागे दडलेले चेहरे मोकळे झाले. सर्वानीच आपापल्या परीने सणाचा मनमुराद आनंद लुटला. फराळाच्या जोडीने श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी अशा पक्वान्नांचा यथेच्छ समाचार घेतला गेला. मात्र यामुळे मधुमेहींची साखरेची पातळी वाढली. प्रदूषण, सामाजिक अंतर न पाळणे व मधुमेह या त्रिकुटामुळे श्वसनसंस्थेच्या विकारांचा धोका (सर्दी, खोकला, घसा दुखणे व खवखवणे, ताप, शिंका, दमा) मोठय़ा प्रमाणावर वाढला. अशा परिस्थितीत तीव्र संसर्गाला बळी पडणारी व्यक्ती ही मोठय़ा प्रमाणात मधुमेही असू शकते. त्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि संरक्षण याविषयी मार्गदर्शन.

मधुमेहात वाढणारी साखरेची पातळी सर्वश्रुत आहे. इन्शुलिन तयार न होणे किंवा इन्शुलिन तयार होऊनही पेशींवरील कार्यात व शर्करा ज्वलनात अडथळा निर्माण होणे यांमुळे साखरेचे प्रमाण वाढू लागते. वाढलेल्या साखरेमुळे कोणताही जंतुसंसर्ग लवकर होतो. साखरेची पातळी अधिक असेल तर कोणत्याही विषाणूची बाधा लवकर होते. म्हणूनच कोविड-१९ च्या या विषाणूस दूर ठेवण्यासाठी मधुमेहींनी आपल्या साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. साखरेची वाढलेली पातळी ही आपली प्रतिकारशक्ती कमी करते, लढाईसाठी सज्ज असणारी सेना कमकुवत करते आणि त्यामुळे करोनाची लागण झाल्यास त्याची तीव्र लक्षणे निर्माण होऊ  शकतात. आयुर्वेदात साखर ही कफकारक मानली आहे व कफज रोगांना (सर्दी, कफयुक्त खोकला, दमा) आमंत्रण देणारी ठरते. करोनामध्ये हीच लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात आणि जीवघेणी ठरू शकतात. मधुमेहींना करोना झाल्यास Diabetic Ketoacidosis हा तीव्र उपद्रव निर्माण होऊ  शकतो. यामुळे Electolytes चा (Sodium, Pottasium) ऱ्हास होतो व जंतुसंसर्गास अटकाव करणे कठीण होते.

विशेष काळजी

  • कोणत्याही सण-समारंभप्रसंगी गोडाचा अतिरेक होणार नाही हे पाहावे.
  • गोड पदार्थ खाताना त्यात स्टीव्हिया/ शुगरफ्री घालून क्वचितप्रसंगी खाता येईल.
  • ल्ल साखरेची पातळी घरच्या उपकरणाद्वारे नेहमी तपासत राहावी व शंका असेल तर प्रयोगशाळेत रक्ताची व लघवीची तपासणी करून घ्यावी.
  • डॉक्टरांनी सुचवलेली औषधे नियमित व ठरावीक मात्रेतच घ्यावीत. गोड खाल्ले म्हणून स्वत:च्या मानाने डोस वाढवण्याची चूक करू नये.
  • साखरेची पातळी अनेकदा कमीपण होऊ  शकते, तेव्हा साखर जवळ ठेवावी.
  • जेवणाच्या वेळा पाळाव्यात. आहारात डाळी, उसळी, भाज्या, अंडी यांचा पुरेसा समावेश असावा. फळांचा रस, मध, बीटची साखर, गूळ, दुधाचे आटीव पदार्थ टाळावेत.
  • रोज १ ते २ चमचे मोड आलेली मेथी अवश्य आहारात घ्यावी.
  • रोज व्यायाम करावा. दीर्घ श्वसन व फुप्फुसांची क्षमता वाढविणारे इतर व्यायाम करावेत. यांमुळे पुरेसा ऑक्सिजन मिळेल.
  • करोनाची प्राथमिक लक्षणे आढळ्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्यानुसार वागावे.
  • रोज सकाळ-संध्याकाळ गरम पाण्यात हळद घालून गुळण्या कराव्यात. नाकाला आतून तेलाचे बोट फिरवावे. रोजच्या आहारातही हळदीचे प्रमाण वाढवावे.
  • मधुमेह आहे म्हणून करोनाच्या भीतीने मनावर ताण देऊ  नये. काळजी घ्यावी, परंतु काळजी करू नये. ताण-तणावामुळे प्रतिकारशक्ती कमी होते.
  • झिरो कॅलरी/ लो कॅलरी असे लिहिलेली तयार पाकिटे पूर्ण वाचून नंतर त्यातील अन्नपदार्थाचा वापर करावा.
  • सर्वासाठी महत्त्वाचे
  • साखरेच्या अतिसेवनापासून दूर राहावे व शर्करा ज्वलनासाठी पुरेसा व्यायाम करावा.
  • आहारातील तळलेले पदार्थ कमी करावेत.
  • ताजी फळे, भाज्या, प्रथिनेयुक्त पदार्थ (दूध, दही, पनीर, मटार, उसळी, डाळी, शेंगदाणे, तीळ) आणि माफक प्रमाणात कबरेदके (भात, पोळी, बटाटे, रताळे) आहारात असावे.
  • रोज चमचाभर साजूक तूप घ्यावे. शिजवलेले अन्न घ्यावे. जेवणात सूप, सार, कढण असे गरम पेय जरूर असावे. त्यात काळेमिरे पूड/ दालचिनी पूड अवश्य घालावी.
  • आले+ दालचिनी+ मिरे+ हळद+ जेष्ठमध+ काळ्या मनुका असा काढा रोज पाव कप घ्यावा. अर्थात याचाही अतिरेक टाळावा.
  • मुगाच्या डाळीची पातळ खिचडी आठवडय़ातून दोन वेळा तरी खावी. त्यात आले व लसूण आवर्जून घालावे.
  • बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून आपण वापरतो तो मास्कही स्वच्छ असावा. अन्यथा त्यातूनही संसर्ग पसरतो. घर व परिसर सॅनिटाइझड असेल हे पाहावे.