भारतीय स्मार्टफोन कंपनी Lava ने भारतात आपले तीन नवीन Tablet लाँच केले आहेत. कंपनीने कमी किंमतीत शानदार फिचर्स असलेले हे तीन टॅबलेट्स खास विद्यार्थ्यांसाठी आणले आहेत. तिन्ही टॅबलेट्समध्ये मोठी स्क्रीन, पॉवरफुल बॅटरी आणि शानदार साउंड क्वालिटी असेल असा कंपनीचा दावा आहे.

भारतात ई-लर्निंग आणि ऑनलाइन क्लासेसचं प्रमाण वाढत असल्याचं बघून विद्यार्थ्यांसाठी हे तीन टॅबलेट्स लावाने लाँच केलेत. लावा मॅग्नम एक्सएल (Lava Magnum XL), लावा ऑरा (Lava Aura ) आणि लावा आइवरी(Lava Ivory) हे तीन टॅबलेट कंपनीने आणले असून तिन्ही टॅबलेटची किंमत अनुक्रमे 15 हजार 499 रुपये, 12 हजार 999 रुपये आणि 9 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे. फक्त ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरुनच हे तिन्ही टॅबलेट खरेदी करता येतील.

जाणून घेऊया लावा टॅबलेट्सचे स्पेसिफिकेशन्स :-
लावा मॅग्नम एक्सएलमध्ये (Lava Magnum XL) 10.1 इंचाची मोठी स्क्रीन आणि 6100 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी कंपनीने दिली आहे. स्क्रीनमध्ये 390 निट्स ब्राइटनेससोबत आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. यात 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेराही आहे. लावाने मॅग्नम एक्स एल हा टॅबलेट MediaTek 2GHz quad core प्रोसेसरसह लाँच केला आहे. या टॅबलेटमध्ये 32 जीबी स्टोरेज असून मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. तर, लावा ऑरामध्ये (Lava Aura) 8 इंचाची स्क्रीन आणि 5100 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. शिवाय यात 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यातसुद्धा कंपनीने मीडियाटेक 2 गीगाहॉर्ट्ज क्वॉडकोर प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. याशिवाय लावा आइवरीमध्ये (Lava Ivory) 7 इंचाची स्क्रीन साइज असून यात 16जीबी स्टोरेज आहे. तीन टॅबलेटपैकी हा लावाचा सर्वात स्वस्त टॅबलेट आहे. तर, 5 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही या टॅबलेटमध्ये दिला आहे.