कार्यालय किंवा कामाच्या स्थानी आहाराच्या गुणवत्तेकडे केले जाणारे दुर्लक्ष हे दीर्घकालीन आजारांना निमंत्रण असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे.

कामाच्या व्यापामुळे कार्यालयानजीक  सहज उपलब्ध असणाऱ्या हलक्या खाद्यपदार्थाच्या सेवनाचे प्रमाण व्यक्तीकडून सातत्याने होत असल्यास स्थूलत्व, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित विविध आजारांचा त्याला सामना करावा लागतो, हा निष्कर्ष अमेरिकेतील प्रचंड मोठय़ा रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आहाराच्या तपशिलांवर कठोर अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. ‘अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेण्टीव्ह मेडिसिन’ या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.  अभ्यासासाठी निवडण्यात आलेले जे कर्मचारी आरोग्यदायी किंवा घरातील अन्नाचे सेवन न करता कार्यालयाजवळील स्वस्त अन्नपदार्थाचे सेवन सातत्याने करीत होते,  त्यांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक वाढल्याचे लक्षात आले. अधिकाधिक शर्करायुक्त पेय आणि शुद्धतेपासून सर्वच बाबतीत आरोग्यास अहितकारक असे अन्न सतत खाल्ल्यामुळे हे कर्मचारी मधुमेह आणि इतर आजारांचे कधीही शिकार होऊ शकतील, अशा स्थितीत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत याआधी करण्यात आलेल्या संशोधनानुसार त्यांची गैरहजेरी, अल्प उत्पादनक्षमता आणि आरोग्यासाठी करण्यात येणारा अधिकाधिक खर्च हा त्यांच्या स्थूलपणास जबाबदार असल्याचे मानले जात होते. मात्र या नव्या संशोधनामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यपूर्ण आहाराकडे आता लक्ष देण्यात येणार असल्याचे मॅसेच्युसेट्स सार्वजनिक रुग्णालय आणि हार्वर्ड मेडिकल स्कूल यांच्यातर्फे संशोधन करणाऱ्या अ‍ॅन थॉर्नडाईक यांनी सांगितले.