व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप zoom च्या समस्या सध्या कमी होताना दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून या अ‍ॅपच्या युझर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु आता युझर्सच्या प्रायव्हसीची समस्या समोर आली आहे. नुकताच झूम अ‍ॅपवर असलेल्या युझर्सपैकी ५ लाखांपेक्षा अधिक युझर्सचा डेटा हॅकर्सनं डार्क वेबला मोफत दिल्याची माहिती समोर आली आहे.

फोर्ब्सच्या रिपोर्ट्सनुसार, सायबर रिस्क असेसमेंट प्लॅटफॉर्म ‘सायबल’च्या तज्ज्ञांनी झूमच्या युझर्सचा डेटा विनामूल्य देणाऱ्या हॅकरची माहिती मिळवली असल्याचं म्हटलं आहे. इंडो एशियन न्यूज सर्विसेसच्या हवाल्यानं न्यू इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, ५ लाखापेक्षा अधिक युझर्सचा डेटा स्वस्तात विकला जात आहे. तर काही ठिकाणी झूमच्या युझर्सचा डेटा मोफतही विकण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये युझर्सचे युझरनेम, पासवर्ड आणि युझरद्वारे देण्यात आलेली माहिती, युआरएल आणि झूम होस्ट की देखील सामिल असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान यावेळी झूमच्या युझर्सची माहिती हॅक करण्यासाठी क्रेडेन्शिअल स्टफिंह मेथड वापरली जात आहे. या अंतर्गत यापूर्वी जितकेही अकाऊंट हॅक करण्यात आले आहेत त्यांचे लॉग इन डिटेल्स वापरून हॅकर्स त्यांच्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस घेत आहेत. तसंच ज्या युझर्सचा अ‍ॅक्सेस मिळत आहे त्यांना एकत्र करून एक यादी तयार करण्यात येत आहे, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सायबलच्या रिपोर्टनुसार अनेक झूम अकाऊंट्सच्या डिटेल्स विकण्यासाठी हॅकर्स फोरमवर अपलोड करण्यात आल्याचंही म्हटलं आहे.

तब्बल ५ लाख ३० हजार झूमचे युझर क्रेडेन्सिअल्स म्हणजेच लॉगिन डिटेल या कंपनीनं खरेदी केल्याचं सायबलनं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी गुगलनंही आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अ‍ॅपचा वापर न करण्याचे निर्देश दिले होते.