सोशल मीडियाचा वापर युजर्सना अधिकाधिक सोपा व्हावा यासाठी फेसबुक, व्हॉटसअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या साईट्सकडून सातत्याने नवनवीन फिचर्स देण्यात येतात. याचा युजर्सना फायदाही होतो. अशाचप्रकारे ट्विटरतर्फे नुकताच एक नवीन फिचर लाँच करण्यात आला असून भारतातील सर्व युजर्ससाठी ‘मोमेंट्स’ हे फिचर लाँच केले आहे. सुरुवातीला हे फिचर ठराविक युजर्ससाठीच उपलब्ध होते. मात्र आता ते सामान्य युजर्ससाठीही उपलब्ध असल्याचे दिसत आहे. तुमच्या प्रोफाईलमध्ये गेल्यावर डाव्या बाजूला होम, नोटिफिकेशन्स आणि मेसेज यामध्ये मोमेंटस या आणखी एका फिचरचा समावेश झाला आहे.

आता हे नवीन काय तर याद्वारे युजर्सना विविध विषयांतील ताज्या बातम्या समजणार आहेत. यामध्ये क्रीडा, मनोरंजन अशा विविध विभागांतील ताज्या बातम्या मिळतील. याशिवाय दिवसभरातील त्याचबरोबर सर्वात चांगले ट्विट्स शोधणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला आधी एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला फॉलो करावे लागत होते. मात्र आता या फिचरमुळे तुम्ही फॉलो केलेले नसले तरीही तुम्हाला ते अपडेट्स मिळू शकतील. यामध्ये दिवसभरात घडलेल्या घडामोडी सहज समजू शकतील.

याआधी सप्टेंबरमध्ये ट्विटरने आपल्या पोस्टच्या शब्दसंख्येमध्ये वाढ केली होती. ही शब्दसंख्या आधी १४० होती. मात्र सप्टेंबरमध्ये केलेल्या बदलामध्ये ती संख्या दुप्पट म्हणजेच २८० करण्यात आली आहे. त्यामुळे ट्विटर युजर्सना जास्त शब्दांत व्यक्त होता येते.