लंडन : संशोधकांनी केस गळतीवर संभाव्य उपचार पद्धत शोधली आहे. हे औषध प्रामुख्याने ऑस्टियोपोरोसिस या रोगावर उपचार करण्यासाठी विकसित केले होते. या रोगामुळे हाडे कमकुवत आणि ठिसूळ बनतात.

हा अभ्यास पीएलओएस बायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दिलेल्या केसांच्या ग्रंथीवर या औषधामुळे वाढीस चालना मिळत असल्याचे आढळून आले. सद्य:स्थितीत पुरुषांमध्ये होणाऱ्या केस गळतीवर केवळ मिनोक्सिडील आणि फिनास्टेराइड ही दोन औषधे उपलब्ध आहेत, परंतु या दोन्ही औषधांमुळे काही प्रमाणात दुष्परिणाम होत असून केसांची वाढ अपेक्षितरित्या होत नसल्याचे आढळले. त्यामुळे रुग्णांना केस प्रत्यारोपण हा एकच उपाय राहतो. त्यामुळे संशोधकांनी केस गळतीवर नव्या प्रकारचे उपाय शोधण्याची सुरुवात केली. यासाठी प्रथम इम्युनोसप्रेसिव औषध (सायक्लोस्पोरिन) आण्विक कार्यप्रणाली शोधण्यापासून केली. सायक्लोस्पोरिन हे १९८०पासून प्रत्यारोपण अस्वीकार दडपणे आणि स्वयंप्रतिकारक रोगावर वापरले जात आहे. परंतु यामुळे गंभीर दुष्परिणाम होत असून अवांच्छित ठिकाणी केसांची वाढ होते. संशोधकांनी सायक्लोस्पोरिनने उपचार केलेल्या डोक्यावरील केसांच्या ग्रंथींचे विश्लेषण केले. येथील ठरावीक जीवनसत्त्व अनेक ऊती त्याचप्रमाणे केसांच्या ग्रंथींच्या वाढीत अडथळा निर्माण करतात. यामुळे हे औषध वापरल्यामुळे अवांच्छित केसांची वाढ का होते हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे ऑस्टियोपोरोसिस रोगाच्या उपचारासाठी तयार केलेले औषध याच कार्यप्रणालीला लक्ष्य करते. यामुळे केसांच्या ग्रंथींची वाढ होत असल्याचे आढळून आले.