देशभरातील मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलने नुकतीच एक खूशखबर दिली आहे. इंटरननेट सुविधा आणि त्यांचे दर यासाठी दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरु आहे. त्यातच एअरटेल देत असलेली ही सुविधा खऱ्या अर्थाने दिलासादायक आहे. विमानप्रवासामध्ये इंटरनेटचा स्पीड मिळत नसल्याने ग्राहकांची निराशआ होताना दिसते. हाच विचार करुन एअरटेलने पुढाकार घेतला असून आपल्या ग्राहकांना खूश करण्याचे ठरवले आहे. यासाठी एअरटेलने ‘सिमलेस एलायंस’ सोबत करारही केला आहे.

एअरटेल लवकरच डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानसेवांमध्ये हायस्पीड इंटरनेट डाटा कनेक्टीव्हिटी देणार आहे. सिमलेस एलायंसच्या जागतिक स्तरावरील भागिदारीमध्ये वनवेब, एयरबस, डेल्टा आणि स्प्रिंट यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या सगळयांसोबत विमानप्रवासासोबत करताना वेगावान स्वरूपात इंटरनेट सेवा मिळणार आहे. याकरिता सॅटेलाईट टेक्निकचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये विमानप्रवासातील इंटरनेट अॅक्सेस सोयीचा आणि स्वस्त व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

आता एअरटेलचे ३७ लाख ग्राहक असून या सर्व ग्राहकांना विमानप्रवास करताना चांगली इंटरनेट सुविधा मिळू शकणार आहे. बर्सिलोनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये याबाबत घोषणा करण्यात आली. एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, सीमलेस एलायंसचे पार्टनर झाल्यानंतर मोबाईल ऑपरेटर्स आणि एअरलाईन्समध्ये नवे पर्व सुरू झाले आहे. एअरटेल ही देशातील सगळ्यात मोठी आणि जगातील तिसरी मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी आहे. एअरटेल सर्वाधिक दक्षिण आशिया आणि आफ्रिकेमध्ये वापरले जाते. ही सुविधा मिळाल्यास फ्लाईटमध्ये विनाव्यत्यय इंटरनेट सुविधा मिळणार आहे. त्यामुळे मोबाईल आणि इंटरनेटच्या क्षेत्रातील ही आणखी एक क्रांती आहे असे म्हणण्यास हरकत नाही.