योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलि समूहाचं Kimbho App पुनरागमनासाठी सज्ज आहे. चॅटिंगसाठी असलेलं हे अॅप नव्या फिचर्ससह २७ ऑगस्टपासून गुगलच्या प्ले-स्टोअरवर उपलब्ध होईल. पतंजलिचे सह-संस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी बुधवारी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली.


पतंजलिचे प्रवक्ता एस.के. तिजारावाला यांनीही ट्विटर अकाउंटवरुन किंभोबाबत माहिती दिली, आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अॅपच्या लॉन्चिंग कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील असं सांगितलं. सर्वप्रथम मे महिन्यामध्ये हे अॅप लॉन्च करण्यात आलं होतं. पण अॅप लॉन्च झाल्याच्या एका दिवसानंतरच किंभो वादात सापडलं. युजर्सना अॅपमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, तसंच यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनाने काही उपाययोजना समोर नसल्याचंही समोर आलं होतं. त्यानंतर हे अॅप प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आलं होतं.

किंभो असे नाव असलेले हे अॅप्लिकेशन स्वदेशी मेसेजिंग अॅप आहे. सध्या बाजारात असलेल्या व्हॉटसअॅप या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशनला टक्कर देण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. आता किंभो म्हणजे काय आणि कंपनीने हे असे नाव का निवडले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर किंभो याचा संस्कृत अर्थ आहे एखाद्याची चौकशी किंवा विचारपूस करणे. याचा अर्थ इंग्रजीमधील हॅलो, हाऊ आर यु किंवा व्हॉटस अप यासारखाच आहे. पतंजलिच्या प्रवक्त्यांनी याबाबत एक ट्विट करत या शब्दाचा हिंदीतून अर्थ सांगितला आहे. यामध्ये त्यांनी आता भारत बोलेल किंभो, भारत विचारेल किंभो असेही लिहीले आहे.