– अ‍ॅड (डॉ. ) प्रशांत माळी आणि पूजा कोर्लेकर

निसर्ग आपले वेगवेगळे रंग वेगवेगळ्या ठिकाणी दाखवतो आणि याचीच प्रचिती माणसांमध्ये सुद्धा दिसून येते. खूप कमी जागा असतात ज्या तिथल्या माणसांवरून ओळखून येतात आता माझ्या रायगडच्याच माणसांची गोष्ट घ्या ना! त्यांचं प्रेम, आदरातिथ्य, माणुसकी तेथे असलेल्या सागराप्रमाणे अफाट आहे. आणि म्हणूनच की काय शिवाजी महाराजांनी आपली राजधानी रायगड निवडली.

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा

इतरांविषयी आपल्या मनात असलेले भाव व्यक्त करण्यासाठी सुशिक्षित किंवा अशिक्षित असण्याची गरज लागत नाही. साधारणतः माणूस जास्त शिकला की त्याच्या अंगी माणुसकी कमी असते असा लोकांचा समज असतो. परंतु आमच्या रायगडच्या माणसांनी मात्र आपुलकीपणाची शिदोरी सुशिक्षितपणे आपल्याजवळ बांधून ठेवलली आहे. २०११ च्या अभ्यासाप्रमाणे रायगडमधील ८४ टक्के लोकं सुशिक्षित आहेत.

माणसाला दोन वेळचं जेवण नसेल तरी चालेल पण दोन आपुलकीच्या शब्दांनी त्याचं पोट भरतं हे बोलायला ठीक वाटतं हो पण भूक मात्र मारता येत नाही. म्हणूनच कि काय इथल्या माणसांनी बनवलेल्या चमचमीत आणि चविष्ट जेवणासोबत प्रेमही आपसूकच पोटात जातं. येथल्या ताज्या मच्छीची चवच काही और आहे. मच्छीचे आगमन घरात झाले की तिला स्वच्छ करून त्यावर झणझणीत मसाला आणि चिंचेची कोळ टाकून चमचमीत कालवण म्हणजे आहाहा स्वर्गसुखच.

विधाता कोणाच्या पदरी काय देईल हे सांगता येत नाही. आता फणस, नारळ, कलिंगड यांचेच उदाहरण घ्या ना. वरून टणक आणि आतून निव्वळ असा तो लुसलुशीत गर! ही फळे मोठ्या प्रमाणात रायगडात का बरे पीकावी? तर, यालाही कारण आहे. ते म्हणजे येथल्या माणसांचा स्वभाव. वरून कितीही कठोर वाटलं तरी आतून जिव्हाळ्याची माणसं ही. अलिबाग, मुरुड जंजिरा येथे मोठ्या प्रमाणावर गारेगार कलिंगड पिकविली जातात. ‘आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट’ असा इथल्या माणसांचा स्वभाव नाही. जे आहे ते असं सरळ, स्वच्छ, उघडपणे सर्वांसमोर आहे. आपल्या दारी आलेला पाहुणा परतत असताना यांचे सुद्धा डोळे पाणावतात परंतु पाहुणा आपल्या दारातून जाताना त्याच्या डोळयात अश्रू येऊ नयेत म्हणून ही लोकं आपला हुंदका मूकपणे पचवितात.

माणसाकडे भरपूर असलं म्हणून तो भरपूर देतो अशी त्याची नियत नसते. इथला प्रत्येक माणूस गर्भश्रीमंत किंवा अत्यंत गरीब आहे असंही नाही परंतु परतत असलेल्या पाहुण्याला आपल्या दाराशी असलेला फणस, नारळ देताना यांचे हातीही कचरत नाहीत. अगदी समृद्ध माणसे आहेत ही! हा वारसा त्यांच्याकडे पिढ्यान् पिढ्या चालत आला असावा.

आपल्या व्यवसायात, काम धंद्यात येथील माणसे खुशालपणे राजासारखी दिमाखात आहेत. रायगडातील माणसेच नाही तर येथला निसर्गही तेवढाच समृद्ध आहे. जगभरातून माणसे रायगडाला भेट देतात. आता तर पुणेकरांना सुद्धा रायगडचे स्वप्न पडू लागलेत. माणसाला जे मिळत नाही त्याच्या शोधात तो जगभर फिरत असतो आणि म्हणूनच की काय पुण्याची माणसं रायगडमध्ये आपुलकी, भरपूर देण्याची भावना, विशिष्ट पद्धतीने बनवलेलं जेवण याच्या शोधार्थ रायगडात येतात. (बोलायची गोष्ट नाही पण पुण्यात समुद्र नाही ना हो.)

इथल्या निसर्गाची कमाल म्हणजे माणसांच्या मनासारखी निसर्गाने येथील लोकांची शरीरे सुद्धा निरोगी आणि निर्मळ बनविली आहेत. रायगडचा निसर्ग तुमच्यासोबत बोलतो, तिथल्या कौलारू घरासमोरच्या सारवलेल्या अंगणात तुम्हाला खेळवतो, आणि जर तुम्ही दुःखी असाल तर रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या हिरव्यागार मोठाल्या झाडांनी तुम्हाला कुशीत घेतो.