दररोज पिस्ता, शेंगदाणे, अक्रोड या प्रकारच्या सुक्या मेव्याचे सेवन केल्यामुळे आकलनशक्ती, शिकण्याची प्रक्रिया, स्मरणशक्तीसह मेंदूच्या इतर कार्यामध्ये सुधारणा होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. पिस्ता, शेंगदाणे आणि अक्रोड यांचे नियमित सेवन केल्यामूळे मेंदूला चालना मिळत असल्याचे अमेरिकेतील लोमा लिन्डा विद्यापीठातील संशोधकांना आढळून आले.

पिस्ता खाल्ल्यामुळे गामा लहर प्रतिसाद निर्माण करतात. जे संज्ञानात्मक प्रक्रिया, माहिती धारणा, शिकणे, समज आणि झोपेदरम्यान होणाऱ्या डोळय़ांच्या जलद हालचालींसाठी महत्त्वपूर्ण असतात. शेंगदाण्यांचा देखील या अभ्यासात समावेश केला असून शेंगदाण्यांमूळे मेंदूमध्ये डेल्टा प्रतिसाद निर्माण होतात. हे डेल्ट प्रतिसाद सक्षम रोग प्रतिकारकशक्ती, नैसर्गिक उपचार आणि गाढ झोपेशी संबंधित असतात. संशोधकांनी सहा प्रकारच्या कठीण कवचाच्या फळांची चाचणी या अभ्यासात केली असून या सर्वाच्या गुणधर्मामध्ये काही फरक आढळून आले. या सर्वामध्ये उपयुक्त अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट्स आढळून आले तर अक्रोडमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट्सचे सर्वात जास्त प्रमाण आढळून आले. या आधीच्या अभ्यासांमध्ये अशा प्रकारच्या सुक्या मेव्याचे सेवन करणे हे हृदयासाठी, कर्करोगाच्या रुग्णांसाठी, पोटातील जळजळ कमी करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मांडले होते.

पण सुक्या मेव्याच्या सेवनामुळे मेंदूवर काय परिणाम होतो यावर फार कमी संशोधन करण्यात आले असल्याचे लोमा लिण्डा विद्यापीठातील सहमुख्याध्यापक ली बर्क यांनी सांगितले. हा अभ्यास ‘एफएएसईबी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.