– डॉ. रितु हिंदुजा

करोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटामुळे देशात जवळपास तीन महिन्यांपासून लॉकडाउन सुरु आहे. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या काही ट्रिटमेंट अपूर्ण राहिल्या होत्या, त्या आता पूर्ण होताना दिसत आहेत. यामध्येच आता अनेक रुग्णालयांमध्ये पुन्हा आयव्हीएफ ट्रिटमेंट सुरु करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. परंतु, आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) च्या माध्यमातून ट्रिटमेंट घेणाऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर पाहुयात या काळात नेमकी कोणती काळजी घ्यावी.

या गोष्टींची काळजी घ्या

१. लॉकडाउनच्या काळात आयव्हीएफ ट्रिटमेंट घेत असलेल्या व्यक्तींनी सुरक्षेची पुरेपूर काळजी घ्यावी.

२. दवाखान्यामध्ये जाताना मास्क घाला आणि घराबाहेर पडण्यापूर्वी सॅनिटायझर आपल्याबरोबर ठेवा.

३. कोणत्याही गोष्टीविषयी शंका असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.

४. आयव्हीएफ उपचार सुरू करताना समुपदेशन करणे फायदेशीर ठरेल. डॉक्टरांकडून शंकांचे निरसन करून घ्या.

५. आपण भेट देणारे क्लिनिक वेळोवेळी सर्व वैद्यकीय उपकरणे निर्जंतुकीकरण करतात का याची खात्री करुन घ्या. तसेच, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा.

६. आपण आयव्हीएफ उपचार घेणार असाल किंवा घेत असाल तर धूम्रपान आणि मद्यपान टाळा. कारण आपल्या उपचारांवर याचा हानिकारक परिणाम होऊ शकतो.

७. रोज संतुलित आहाराचे सेवन करा आणि व्यायामाला प्राधान्य द्या. फळे, भाज्या, धान्य, दुध, शेंगदाणे, बियाणे यांचा आहारात समावेश असू द्या. साखर, चहा किंवा कॉफीत असणारे उत्तेजक द्रव्य, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जंक फूडचे सेवन टाळा. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या.

८. योग आणि ध्यान यांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप घ्या.

९. आपल्या प्रियजनांबरोबर चांगला वेळ घालवा. हे आपल्याला जोडीदारासोबत आपले नाते आणखी मजबूत करा आणि आनंदी रहा.

टेस्ट ट्युब बेबी किंवा इन व्रिटो गर्भधारणा (आयव्हीएफ) ही वंधत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार पध्दती आहे. आयव्हीएफ उपचार पध्दतीत शुक्रजंतुच्या मदतीने बीजफलन केले जाते आणि त्यानंतर हे फलित बीज गर्भाशयात सोडले जाते, जेणेकरून एक सुदृढ गर्भ आकारास येऊ शकेल. आयव्हीएफ उपचार पद्धतीमध्ये अगदी सुरूवातीस रूग्णास गोनॅडोट्रोफिन्सची (पुनरूत्पादक संप्रेरके) इंजेक्‍शन्स (अंडाशयास उत्तेजित करण्यासाठी) दिली जातात. त्यानंतर जनरल ऐनेस्थेशिया (संपूर्ण भूल) देऊन उसाईट पिकअप नावाची एक छोटी प्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये अंडाणु पूर्वस्थितीत येण्यासाठी अल्ट्रासाउंड मशीनचा वापर केला जातो. इनक्‍युबेटरमध्ये बीज सुरक्षितपणे स्थापित केल्यानंतर शुक्रजंतू आणि बीज यांना एकत्र आणण्यासाठी इन्ट्रा सायटोप्लास्टिक स्पर्म इंजेक्‍शन (आयसीएसआय) दिले जाते. या पद्धतीमध्ये प्रत्येक शुक्रजंतुबरोबर प्रत्येक बीज स्वतंत्रपणे इंजेक्‍ट केले जाते. एकदा ही बीज फलनाची प्रक्रिया पार पडली की त्यातून तयार झालेले गर्भ वेगवेगळ्या काळासाठी इनक्‍युबेटरमध्ये ठेवले जातात. हा कालावधी संपल्यानंतर त्यापैकी उत्कृष्ट गर्भ निवडून गर्भाशयामध्ये पुनःस्थापित केले जातात. या प्रक्रियेस एम्ब्रयो ट्रान्सफर (ईटी) असे म्हंटले जाते.

(डॉ. रितु हिंदुजा, या मुंबईतील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी येथे फर्टिलिटी कन्सल्टंट आहेत.)