शिओमी कंपनी मागच्या काही दिवसांपासून भलतीच फॉर्ममध्ये आहे. आपली नवनवीन उत्पादने बाजारात दाखल करण्यात कंपनीची यंत्रणा व्यस्त आहे. नुकतेच कंपनीने आपले Redmi 6 Pro हे नवीन मॉडेल लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. याबरोबरच Mi Pad 4 हा टॅबही कंपनी लाँच करत आहे. या दोन्हीचे फोटो आणि फिचर्स नुकतेच लिक झाले असून ग्राहकांमध्ये त्याबाबत उत्सुकता वाढत आहे. कंपनीने आपला Redmi 6 आणि Redmi 6A चीनमध्ये आधीच लाँच केला होता. त्यानंतर आता हे आणखी एक नवीन मॉडेल दाखल करणार आहे. ही दोन्ही उत्पादने चीनमध्ये २५ जून रोजी लाँच होतील असे सांगण्यात आले आहे. मात्र ही उत्पादने भारतात कधी येणार याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही.

कंपनीचा असा पहिला फोन आहे ज्यामध्ये आयफोन X प्रमाणे नॉच देण्यात आला आहे. चीनमधील सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका टिझरवरुन फोनबाबतच्या काही गोष्टी स्पष्ट होत असल्याचे दिसते. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर असेल असा अंदाज आहे. हा हँडसेट रेडमी ६ च्या तुलनेत थोडा मोठा आहे. यामध्ये व्हर्टीकल ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप आणि वरच्या भागात रेडमी ८ प्रमाणे नॉच देण्यात आला आहे. रिअर कॅमेरा १२ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा असेल. याचे २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज, ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज तसेच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असे तीन व्हेरिएंट देण्यात आले आहेत.

Mi Pad 4 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर देण्यात आला आहे. हा टॅबलेट पीसी असेल असे बोलले जात असून तो प्रत्यक्षात हातात येईल तेव्हाच अंदाज येईल. याची बॅटरी ६ हजार मिलिअॅम्पियर्सची असेल. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा असेल असे सांगण्यात आले आहे.