करोना व्हायरस महामारीमुळे लॉकडाउनदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि रिमोट वर्किंग अ‍ॅप्लिकेशन्सची मागणी प्रचंड वाढलीये. परिणामी Zoom आणि Google Meets यांसारखे अ‍ॅप्स अगदी कमी कालावधीतच लोकप्रिय झाले आणि त्यांचा वापर वाढला. ग्राहकांची ही गरज ओळखून आता आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप आणलं आहे. कंपनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप JioMeet लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

रिलायन्स जिओ लवकरच JioMeet ही सर्व्हिस देशभरात रोलआउट करणार आहे. JioMeet ही HD व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सर्व्हिस सर्व डिव्हाइस आणि सर्व ऑपरेटिंग सिस्टिमला सपोर्ट करेल.

‘आम्ही JioMeet सर्व्हिस लॉन्च करण्याच्या अगदी जवळ आहोत. थोड्या दिवसांमध्येच ही सेवा सुरू केली जाईल’, अशी माहिती कंपनीकडून गुरूवारी देण्यात आली. “सर्व प्रकारचे डिव्हाइस आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टिमवर JioMeet ही HD व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सर्व्हिस काम करेल. जिओची ही सेवा अन्य कंपन्यांपेक्षा बरीच वेगळी असेल.”, असे रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे वरिष्ठ उपाध्यक्ष, पंकज पवार म्हणाले.

JioMeet मध्ये कोणते नवीन फीचर्स असतीय याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही. मात्र, JioMeet व्हिडिओ कॉलिंग सर्व्हिस सुरू झाल्यानंतर Zoom सारख्या अन्य अ‍ॅप्सना त्याचा मोठा फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.