सर्वोच्च न्यायालयाने बीएस-4 वाहनांच्या विक्रीबाबत ऑटो क्षेत्राला दिलासा दिला आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने वाहन वितरकांना दिलासा देताना बीएस-4 वाहनांच्या विक्री आणि नोंदणीसाठी 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. म्हणजे आता 31 मार्चनंतरही बीएस-4 वाहनांची विक्री आणि नोंदणी सुरू असेल. करोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाउन असल्याने सर्वोच्च न्यायालयाने 24 एप्रिल म्हणजे लॉकडाउन संपल्यानंतरचे अतिरिक्त 10 दिवस मुदतवाढ दिली आहे. पण, ही मुदतवाढ दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे तेथील वाहन वितरकांसाठी नसेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली.

गेल्या आठवड्यात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (FADA) या वाहन वितरकांच्या संघटनेने BSIV वाहनांच्या विक्री आणि रजिस्ट्रेशनसाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत ‘फाडा’च्या वकिलांनी लॉकडाउनमुळे संपूर्ण दुकाने बंद आहेत, ग्राहक नाहीत. त्यामुळे वाहन वितरकांकडे बीएस-४ वाहनांचा स्टॉक तसाच पडून आहे. त्यामुळे त्यांना मोठा तोटा होईल असा युक्तिवाद केला. त्यावर कोर्टाने BSIV वाहनांच्या विक्रीसाठी ३१ मे पर्यंत मुदतवाढ देता येणार नसल्याचं स्पष्ट केलं. पण, लॉकडाउन संपल्यानंतरचे अतिरिक्त १० दिवस मुदतवाढ दिली. तसेच, ही मुदतवाढ दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे तेथील वाहन वितरकांसाठी नसेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले. यापूर्वी, गेल्या आठवड्यात FADA चे अध्यक्ष आशिष हर्षराज काळे यांनी, देशभरात अद्यापही विविध डिलर्सकडे 8.35 लाख BSIV वाहनांचा स्टॉक शिल्लक असून त्याची किंमत जवळपास 6,400 कोटी रुपये असल्याचं सांगितलं होतं. तसेच, करोनामुळे वाहन विक्रीमध्ये 60 ते 70 टक्के घट झाल्याचंही ते म्हणाले होते.

यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक एप्रिल 2020 आणि त्यानंतर उत्पादित होणाऱ्या आणि साडेतीन हजार किलो वजनापर्यंतच्या वाहनांची ‘उत्सर्जन मानके’ (इमिशन स्टँडर्ड) ‘बीएस-6’च्या निकषांप्रमाणे असणे बंधनकारक असल्याची अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने काढली होती. त्यानुसार ऑटो क्षेत्राला आपल्याकडील बीएस-4 इंजिन असलेल्या वाहनांचा स्टॉक संपवण्यासाठी ३१ मार्च २०२० पर्यंतची मुदत मिळाली होती. पण, आता सर्वोच्च न्यायालयाने 24 एप्रिल म्हणजे लॉकडाउन संपल्यानंतरचे अतिरिक्त 10 दिवस मुदतवाढ दिली आहे.