एकेकाळी स्कार्फचा वापर हिवाळ्यात कान आणि डोके झाकण्यापुरता केला जात होता. पण आता हा प्रत्येक मोसमात घातलेला पाहायला मिळतो. स्कार्फ आता फॅशन जगतात महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. स्कार्फ बांधण्याची फॅशन निर्माण झाली आहे. टय़ूनिक टॉप असो किंवा स्ट्रेचेबल शर्ट, शॉर्ट शर्ट असो किंवा टीशर्ट, मिनी स्कर्ट असो किंवा लाँग स्कर्ट, फॉर्मल ड्रेस असो किंवा जिन्स पॅन्ट लेगिंग्स प्रत्येक पोशाखासोबत स्कार्फ चांगले दिसतात. दिवसेंदिवस स्कार्फ तोंडाला गुंडाळण्याची पद्धत रूढ होत आहे. स्कार्फ ही तशी बहुउपयोगी वस्तू. पाऊस, ऊन, वाऱ्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी बहुतांश मंडळी स्कार्फचा वापर करतात. धूळ किंवा अन्य गोष्टींची अॅलर्जी होऊ नये म्हणून चेहऱ्यावर स्कार्फ बांधला जातो.
मुलींमध्ये स्कार्फ बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. या वर्षी थंडीने दांडी मारली असली तरीही तरणाईचे स्कार्फप्रेम कमी होत नाही. मुलींबरोबरच मुलेही यात मागे नाहीत. मात्र थंडीचा ऋतू गेला तरी स्कार्फ मात्र जाण्याचे नाव घेत नाही. हवा तापायला लागल्यावर स्कार्फ आता थोडे सैल झालेत. पण स्टाइल म्हणून आवडू लागलेले स्कार्फ उन्हाळ्यातही त्यांच्या गळ्याला असेच घट्ट बिलगून राहतात. महाविद्यालयातील तमाम तरुणाई ही ‘एक्स्ट्रा अॅक्सेसरीस्’ म्हणून स्कार्फ घालत आहेत. या स्कार्फचा मुलींना मात्र दुहेरी उपयोग करता येतो, असे आढळते. कुठल्याही टी-शर्ट, कुर्ती, शर्ट किंवा अगदी ओढणीवाल्या पंजाबी ड्रेसवरही मुलींना स्कार्फ बांधता येतो. एरवी फॅशन म्हणून इन असलेला स्कार्फ आता युथचा गरजेचा ट्रेण्ड झालाय. विशेषत: तरुण मुले याकडे विशेष लक्ष देऊ  लागली आहेत. चेहऱ्याच्या त्वचेचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून बाईक चालवताना हवेच्या माऱ्यामुळे किंवा हेल्मेटमुळे हेअर स्टाइल बिघडू नये म्हणूनही काही तरुण मुले या स्कार्फचा वापर करताना दिसतात. त्यातही डिझायनर स्कार्फ दिसतात. स्कार्फ घालत असाल तर गळ्यात इतर कुठले दागिने नाही घातले तरी चालतात. हा एक स्कार्फचा फायदा आहे. यामध्ये पेस्टल शेड, सिल्क, कॉटन असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. अगदी कॉलेजच्या कॅम्पसपासून फाइव्ह स्टार ग्लॅमरस सोशलाइट्सपर्यंत सगळ्यांनाच स्कार्फ हे स्टायलीश वाटायला लागले आहेत.
ऑक्टोबर हिटमध्ये प्रदूषण आणि चटके बसवणारे उन्हापासून संरक्षण म्हणून वापरले जाणारे स्कार्फ पुन्हा नव्या फॅशनमध्ये येत आहेत. स्टोल्सबरोबर शॉल्सचीही मार्केटमध्ये यंदा चलती आहे. एखाद्या पार्टीसाठी किंवा खास कार्यक्रमासाठी जाताना या स्कार्फ वापरता येतात. वजनाला हलके आणि उन्हापासून संरक्षण करतील असे स्टोल्स आणि स्कार्फ सध्या मुलींमध्ये अधिक लोकप्रिय झाले आहेत. कॉटन, सिल्क, पश्मिरा, काश्मिरी सिल्क या अशा फॅब्रिक्समध्ये त्या उपलब्ध आहेत. याबरोबरच ऑफिस किंवा कॉलेज प्रेझेंटेशनसाठी उपयोगी पडतील असे स्कीलचे स्टोन्सही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. साधारण १०० रुपयांपासून हे सिल्कचे स्टोल्स मिळतात. स्कार्फ म्हटले की पुण्याचा उल्लेख होत असला तरी स्कार्फचा उपयोग लक्षात घेऊन ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीमध्येही स्कार्फचा वापर आता सर्रार होऊ लागला आहे.
स्कार्फचे काही प्रकार..
’कश्मिरी सिल्क : हे कापड मऊदार आणि वजनाने हलके असते. यामधील स्कार्फस्च्या रंगामध्ये नेहमीच नावीन्य दिसून येते. काश्मिरी स्कार्फ खासकरून रात्रीच्या वेळी समारंभांना किंवा कार्यक्रमांना वापरलेले जातात. सर्वसामान्य स्कार्फसपेक्षा हे स्कार्फ महाग असतात.
’कॉटन : कॉटनचे स्कार्फ हे सार्वधिक वापरले जाणारे स्कार्फ आहेत. हे स्कार्फ मऊ असतात. ऑक्टोबर हिटसाठी कॉटन स्कार्फ हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. कॉटनचे स्कार्फ हे घाम शोषून घेण्यास मदत करतात. यामधील फिकट रंग सर्वाधिक आवडीचे बनले आहेत.
’सॅटीन : सॅटीनचे स्कार्फ हे अतिशय चमकदार आणि सुळसुळीत स्वरूपाचे असतात. या स्कार्फचा सर्वाधिक वापर कॉपरेरेट ऑफिसेसमधील तरुणी करतात. फॉर्मल स्कर्ट आणि शर्ट वर टायस्टाइलमध्ये अशा प्रकारचे स्कार्फ वापरण्याची चलती आहे. यामध्ये फिकट आणि गडद अशा दोन्ही प्रकारच्या रंगांचा वापर केला जातो.
’सिल्क : ‘सिल्क’ हे कापड अतिशय श्रीमंत. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे या कापडाचे स्कार्फ सर्व प्रकारच्या कपडय़ांवर शोभून दिसते. यामध्ये सध्या चलती असणारे सर्वच इंग्लिश कलर उपलब्ध आहेत.
’लोकर : लोकरीचे स्कार्फ हे फार जुन्या काळापासून लोकप्रिय आहेत. हल्लीची तरुण पिढीला नेहमीच काहीतरी नवीन हवे असते. हिंदी सिनेसृष्टीतील नामांकित कलाकारांपैकी एक म्हणजे देवानंद. देवानंद यांनी लोकरीच्या स्कार्फस्ना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. देवानंद यांनी जगप्रसिद्ध केलेली स्टाइल आजही तरुण-तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. मफलरच्या स्वरूपातही हे स्कार्फ उपलब्ध असतात, मात्र त्याचा अधुनिक अवतार आजच्या तरुणांना आवडत आहे.