व्हॉट्सअ‍ॅपला होत असलेल्या विरोधामुळे गेल्या काही दिवसांमध्ये लोकप्रिय ठरलेलं सिग्नल (Signal) हे मेसेजिंग अ‍ॅप क्रॅश झालं होतं. अचानक युजर्सची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आणि डाउनलोडिंगच्या प्रमाणात वाढ झाल्याने १५ जानेवारी रोजी सिग्नल अ‍ॅपच्या सर्व्हरमध्ये समस्या उद्भवली होती. २४ तासांनंतर अ‍ॅपची सेवा पूर्ववत झाली आहे.

“सेवा पूर्ववत झाल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. तसेच सर्व्हर डाउन झाल्यापासून आतापर्यंत आम्ही खूप काही शिकलो…आम्ही आमची क्षमता वाढवली असून तुम्ही दाखवलेल्या संयमाबद्दल आभार”, अशा आशयाचं ट्विट सिग्नलने केले आहे. त्यापूर्वी सर्व्हर डाउन होताच कंपनीने ट्विट करुन माहिती दिली होती. “तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे, लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत”, अशी माहिती कंपनीने दिली होती.

(WhatsApp ला झटका, भारतातील टॉप फ्री अ‍ॅप बनलं Signal; काय आहे खासियत?)


दरम्यान, व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेक युजर्स सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या अ‍ॅपचा वापर करण्याकडे वळले आहेत. सिग्नल अ‍ॅपच्या लोकप्रियतेमध्ये तर प्रचंड वाढ झाली असून अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सिग्नल अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅपवरही मात केली आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत सिग्नल अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकून भारतातील अव्वल फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलीये.