उन्हाळ्यामुळे शरीराची होणारी लाहीलाही दिवसेंदिवस वाढत आहे. या उकाड्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. तापमानाचा पारा वाढत असताना आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भारतीय आहारात शरीराला थंडावा देणारे अनेक पदार्थ आहेत. या पदार्थांचा आहारातील समावेश वाढविल्यास निश्चितच फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात या पदार्थांविषयी…

गुलकंद

गुलाब पाकळ्या, साखर आणि अन्य काही वनौषधींचा वापर करून बनवण्यात येणारा गुलकंद हा उन्हाळ्यात आहारात असावा असा एक उत्तम पदार्थ आहे. उन्हाळ्याच्या दिवसात येणारा थकवा दूर करण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील टवटवीतपणा टिकून राहण्यासाठी गुलकंद उपयुक्त ठरतो. सकाळी उठल्यावर एक चमचा आणि दुपारच्या तसेच रात्रीच्या जेवणांनंतर अर्धा चमचा गुलकंद खाल्ल्यास उन्हाळ्याच्या दिवसांत होणारे उष्णतेचे त्रास कमी होण्यास मदत होते.

आंबा

फळांचा राजा हे उन्हाळ्यात येणारे खास फळ आहे. या दिवसांत आंबा खाल्ल्याने शरीरातील उत्साह आणि ताकद टीकून राहण्यास मदत होते. मात्र तो कसा खावा हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. खाण्यापूर्वी आंबा २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा. चवीला हवेहवेसे वाटणारे हे फळ शरीरातील क्रिया सुरळीत होण्यासाठीही उपयुक्त असते. आंबा गोड असल्याने त्यामुळे वजन तसेच रक्तातील साखर वाढते असा आपला समज असतो. मात्र आंबा खाल्ल्याने वजन कमी होते असे काही अभ्यासांतून समोर आले आहे.

जिरे

हा पदार्थ आपण रोजच्या जेवणात वापरतो. मात्र त्याचे गुणधर्म आपल्याला माहित असतीलच असे नाही. शरीरात साठलेला मेद कमी करण्यासाठी तसेच नसांना आराम देण्यासाठी जिरे उपयोगी असते. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चिमूटभर काळं मीठ ताकात घालून प्यायल्यास शरीराला हवा असलेला थंडावा मिळतो.

दही

उन्हाळ्याच्या दिवसांत बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होणाऱ्यांसाठी दही खाणे एक उत्तम उपाय आहे. मात्र हे दही घरी लावलेलं असावं. याबरोबरच दहीभाताचा जेवणात समावेश करावा, त्याचा चांगला फायदा होतो.

नारळ पाणी

उन्हामुळे या दिवसांत डिहायड्रेशनमुळे शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक कमी होतात. त्याचे प्रमाण योग्य ते रहावे यासाठी नारळ पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी तसेच सतत येणारे क्रॅम्प्स आणि डिहायड्रेशन यावर नारळ पाणी उत्तम आणि सोपा उपाय होय.

कोकम सरबत

कोकम सरबत हे उन्हाळ्यातील समस्यांवर उत्तम उपाय आहे. कोकम लठ्ठपणावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरते. तोंडाचा आणि पोटाचा अल्सर होऊ नये म्हणून तसेच इतरही अनेक समस्यांवर कोकम उपयुक्त ठरते.