News Flash

फॅशनबाजार : सुपरहिरोंची सुपर फॅशन

सिनेमा आणि फॅशन याचं नातं एकमेकांमध्ये किती घट्ट गुंफलेलं आहे, हे वेगळं सांगायला नको.

सिनेमा आणि फॅशन याचं नातं एकमेकांमध्ये किती घट्ट गुंफलेलं आहे, हे वेगळं सांगायला नको. अगदी सातासमुद्रापारची हॉलीवूडनगरी असो किंवा आपली हक्काची बॉलीवूड मायानगरी सिनेमातील नटनटय़ा त्यांचे कपडे, मेकअप, हेअरस्टाइल्स, दागिने याचं आकर्षण आपल्याला असतंच. त्यामुळे एकदा एखाद्या सिनेमातील फॅशनबद्दल कॉलेजकट्टय़ावर चर्चा सुरू झाल्या, की तिचे आगमन बाजारपेठांमध्ये होण्यास सुरुवात होते. एरवीच्या सिनेमांची ही बाब असेल, तर सुपरहिरोंची मोहिनी काय असेल, याची कल्पना नक्कीच करता येऊ शकते.

लहानपणी कार्टून्स, कॉमिक पुस्तकांमधून आपल्याला भेटलेले सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, अ‍ॅव्हेंजर्स मोठय़ा पडद्यावर थ्रीडी, फोरडीच्या स्वरूपात आल्यावर त्यांचा प्रभाव केवळ लहान मुलांपर्यंत उरत नाही, तर आबालवृद्ध त्यांच्या प्रेमात पडतात. यंदाचं वर्ष तर या सुपरहिरोंचं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण डेडपूल, बॅटमॅन व्हस्रेस सुपरमॅन हे सिनेमे नुकतेच प्रदíशत झाले आहेत आणि येत्या काही महिन्यात कॅप्टन अमेरिका, एक्स मॅन, निंजा टर्टल्स, स्टार ट्रक हे सिनेमे येऊ घातले आहेत. मग अशा वेळी फॅशन क्षेत्र या सुपरहिरोंकडे दुर्लक्ष करील, असं होणं शक्यच नाही. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत सुपरहिरोंवर प्रभावित कपडे असा विषय निघाला की लेदरचे सूट, मोठ्ठाले केप, तोंड झाकणारा मास्क इतकंच डोळ्यांसमोर येत असे. सुपरमॅनप्रमाणे निळे कपडे आणि त्यावर लाल चड्डी किंवा स्पायडरमॅनप्रमाणे अंगभर पॉलिएस्टर सूट घालण्याचे धाडस कोणीच केलं नसतं. फार तर लहान मुलांची बर्थडे पार्टी, शाळेतील फॅन्सी ड्रेस स्पर्धा या निमित्ताने हे पोशाख घातले जायचे. पण सध्या याच सुपरहिरोंवर प्रेरणा घेतलेले अनेक कपडे, ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरीज बाजारात आल्या आहेत.
शहरात कोणतंही संकट आल्यावर चेहऱ्यावर मास्क लावून, आपली खरी ओळख लपवून हे सुपरहिरो आपल्या मदतीस येतात, ही या सुपरहिरोंबाबतची मूळ संकल्पना असते. त्यामुळे त्यांना मिळालेल्या किंवा त्यांनी कमविलेल्या शक्ती, त्यांचा मुलखावेगळा पोशाख, त्यांची बोधचिन्हे, मास्क हीच त्यांची मूळ ओळख असते. त्यातच गारूड प्रेक्षक आणि चाहत्यांवर असतं. याचं बाबींना केंद्रस्थानी ठेवून विविध कपडे बाजारात आले आहेत. आपल्या रोजच्या वापरातील टी-शर्ट्स, शॉर्ट पँट्स, जॅकेट्स, शूज, ज्वेलरी यांच्यावर या बोधचिन्ह, माक्स यांची छाप पाहायला मिळताहेत.

कपडे
सुपरहिरोंचे मास्क, चेहरे पिंट्र केलेले टी-शर्ट, गंजी, क्रॉप टॉप, शॉर्ट पँट, टाय, जॅकेट्स सध्या बाजारात पाहायला मिळतील. विशेषत: बॅटमॅन व्हस्रेस सुपरमॅन या चित्रपटाच्या टायटलमध्ये या दोघांचे बोधचिन्ह एकत्र करून तयार केलेलं नवीन चिन्ह सध्या तरुणांमध्ये अधिक प्रसिद्ध आहे. काळ्या आणि लाल छटेतील या चिन्हाचे पिंट्र असलेल्या टी-शर्ट्सना मोठी मागणी आहे. तसेच कॅप्टन अमेरिकाची ढाल, आयनमॅनचा मुखवटा, अ‍ॅव्हेंजर्सचा लोगो, स्टार वॉरमधील मुखवटे यांचे पिंट्र्स तुम्हाला कपडय़ांवर पाहायला मिळतील. बॅटमॅनचा शत्रू जोकर यानेही टी-शर्ट्समध्ये स्वत:चे स्थान पटकावले आहे. हे कपडे युनिसेक्स प्रकारात मोडतात. त्यामुळे मुलांप्रमाणेच मुलीसुद्धा त्यांच्या लाडक्या सुपरहिरोचे कपडे सहज मिरवू शकतात. अगदी ऑफिसच्या नेहमीच्या रटाळ टायवर सुद्धा सुपरमॅन, बॅटमॅनच्या लोगोच्या छबी पाहायला मिळतात. साधारणपणे २०० रुपयांपासून अगदी हजार रुपयांपर्यंत या कपडय़ांचे विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.

नेलआर्ट
नेलआर्ट सध्या तरुणींमध्ये प्रसिद्ध आहे. अगदी यूटय़ूबवरील व्हिडीओ पाहून घरच्या घरी नेलआर्ट करण्यापासून ते नेलपार्लर्समध्ये जाऊन महागडे नेलआर्ट करण्याची त्यांची तयारी असते. सध्या अनेक नेलपार्लर्समध्ये सुपरहिरोंचे लोगो नखांवर काढून मिळतात. त्यासाठी तुमची २००० ते ५००० रुपये खर्च करायची तयारी असली पाहिजे. यूटय़ूबवर या संदर्भातील व्हिडओसुद्धा उपलब्ध आहेत.

‘अ‍ॅक्सेसरीज’
सुपरहिरोंच्या लोगोंच्या की-चेन सध्या लोकप्रिय आहेतच. पण त्यासोबत ब्रेसलेट्स, अंगठय़ा, पेंडेंट्स यांवरसुद्धा हे लोगो पाहायला मिळतात. मोबाइल हा तरुणाईचा जीव की प्राण. त्यात दरवेळी ट्रेंडी मोबाइल कव्हर मिरवणं हा त्यांचा लाडका उद्योग. या कव्हर्सवरसुद्धा सुपरहिरोंनी जागा पटकावली आहे. आयनमॅन, अ‍ॅव्हेंजर्स, बॅटमॅन, सुपरमॅन, स्टार वॉरचे पिंट्र असलेले कव्हर्स बाजारात उपलब्ध आहेत. मुलांसाठी ‘आय एम नॉट सुपरमॅन’ अशा खास मार्मिक टिप्पणीचे कव्हर्ससुद्धा बाजारात आहेत. सुपरहिरोंचे लोगो पिंट्र केलेले कॅन्व्हास शूजसुद्धा फॅशन स्ट्रीटवर आले आहेत. ५० रुपयांच्या की-चेनपासून ब्रेसलेट, अंगठय़ा, पेंडेंट्सच्या किमती ५०० रुपयांपर्यंत जातात. मोबाइल कव्हर्स २०० रुपयांपासून सहज मिळतील. शूजच्या किमती ५०० ते हजाराच्या घरात आहेत.

कुठे मिळतील?
मुंबईतील वांद्रे हिल रोड, फॅशन स्ट्रीट, अंधेरी लोखंडवाला मार्केटमध्ये हे कपडे, अ‍ॅक्सेसरीज तुम्हाला सहज मिळतील. तुमच्या आसपासच्या परिसरातील कपडय़ांच्या दुकानातसुद्धा अशा प्रकारचे पिंट्र्स असलेले कपडे पाहायला मिळतील. बांद्रा हिल रोडमार्गावर काही डिझायनर्स स्टोर्स आहेत. सुपरहिरोंचे हटके पिंट्र्स असलेले कपडे हवे असल्यास त्यांना नक्की भेट द्या. अर्थात तिथे खिशाला मोठी कात्री लागेल हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2016 12:58 am

Web Title: superhero inspired fashion
टॅग : Fashion
Next Stories
1 घरातील धूम्रपानामुळे मुलाच्या आजारपणाला हातभार
2 आता मिठाईदेखील मिळणार ऑनलाईन!
3 स्वादुपिंडाच्या कर्करोगावर नवीन उपचार शक्य
Just Now!
X