बेंगळुरूमधील स्विगी हे फूड डिलेव्हरी अॅप्लिकेशन आज प्रत्येकाला ठाऊक आहे. स्विगी कंपनी सुरु होऊन पाच वर्षांहून अधिक काळ झाला आहे. तशी अनेक फूड डिलेव्हरी अॅप उपलब्ध असली तरी भारतामध्ये प्रामुख्याने स्विगी आणि झोमॅटो हे दोन अॅप्लिकेशन्स प्रचंड लोकप्रिय आहेत. स्वागीने पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आपल्या युझर्सबद्दलचे काही खास माहिती जाहीर केली आहे. या माहितीनुसार बेंगळुरूमधील एका व्यक्तीने अॅप्लिकेशनवरुन पाच वर्षात चक्क १७ हजार ९६२ वेळा ऑर्डर केली आहे. म्हणजे या व्यक्तीने एक हजार ८२४ दिवसांमध्ये रोज जवळजवळ सरासरी १० वेळा स्विगीवरुन फूड ऑर्डर केली आहे.

याशिवाय अॅपवरील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट म्हणून बेंगळुरूमधील ट्रफल्स या रेस्टॉरंटची निवड करण्यात आली आहे. या रेस्टॉरंटमधून दिवसाला दहा हजार हून अधिकजण ऑर्डर करतात. तसेच या रेस्टॉरंटने सर्वात जलद १००, १००० आणि १०००० ऑर्डर्सचा टप्पा गाठला आहे.

या अॅप्लिकेशनवरुन सर्वाधिक महागडी ऑर्डर ही ७६ हजार ५२७ रुपयांची होती. एका युझरने इतक्या मोठ्या रकमेची आइस्क्रीम एकाच वेळी ऑर्डर केल्याचे स्विगीने सांगितले आहे.

कोणत्या पदार्थाला सर्वाधिक मागणी

बिर्याणी तशी हौदराबादमध्ये लोकप्रिय असेल तर तुमचा समज चुकीचा आहे. बिर्याणी हा भारताचा सर्वात आवडता पदार्थ ठरला आहे. बिर्याणी देशभरामध्ये सर्वाधिक वेळा मागवला गेलेला पदार्थ असल्याचे स्विगीने म्हटले आहे. प्रत्येक मिनिटाला स्विगीवरुन ४३ जण बिर्याणी ऑर्डर करतात. सर्वात लोकप्रिय पदार्थांच्या यादीमध्ये डोसा दुसऱ्या स्थानी तर बर्गर तिसऱ्या स्थानी आहे.

गोड पदार्थांमध्ये गुलाबजाम हा स्विगीवरुन सर्वाधिक वेळा मागवण्यात येणारा पदार्थ आहे. गोड पदार्थांमध्ये रसमलाई दुसऱ्या स्थानी आहे. तसेच भारत चहावर चालतो असं तुमचं म्हणणं असेल तर स्विगीचं म्हणणं थोडं वेगळ आहे. स्विगीवर चहापेक्षा कॉफी ऑर्डर करण्याचे प्रमाण अधिक असून कॉफी हे या अॅपवरुन मागवण्यात येणारे पहिल्या क्रमांकाचे पेय आहे.

स्विगीने दिलेल्या माहितीनुसार डॉमिनोज, मॅकडॉनल्ड्स, सबवे, बर्गर किंग यासारख्या प्रसिद्ध फूड जॉइण्टमधून सर्वाधिक पदार्थ ऑर्डर केले जातात. विशेष म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री या लोकप्रिय फूड जॉइण्टमधून पदार्थ ऑर्डर करण्याचे प्रमाण अधिक आहे.

मागील पाच वर्षांमध्ये स्विगी देशातील २९० हून अधिक शहरांमध्ये आपली सेवा पुरवते. तर स्विगीवर दोन लाखांहून अधिक हॉटेल्स, फूड जॉइण्टसचा पर्याय उपलब्ध आहे. फूड डिलेव्हरी अॅप्लिकेशन म्हणून लोकप्रिय असणाऱ्या स्विगीने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात गुरुग्राममध्ये फळे, भाज्या, धान्य आणि इतर घरगुती वस्तू विकण्याचे पहिले दुकान सुरु केले आहे. तसेच स्विगीने स्विगी डेली ही सेवा सुरु केली असून यामध्ये घरगुती पद्धतीचे जेवण स्वयंपाकी घरी येऊन तयार करतात.