सध्याच्या काळाच कोणतीही गोष्ट कमी कालावधीत पूर्ण व्हावी याकडे आपल्या सगळ्यांचाच कल असतो. त्यामुळे सहाजिकच दैनंदिन जीवनातील कामं सोयीस्कररित्या करण्यासाठी आपण सगळ्यांनीच तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. आज अनेकांच्या घरात टीव्ही, फ्रीज, गॅस या गोष्टी आवर्जुन पाहायला मिळतात. परंतु, सध्याच्या घडीला गॅस हा महिलांचा अत्यंत जवळचा मित्र असल्याचं पाहायला मिळतं. पुर्वी चुलीवर स्वयंपाक करण्याची पद्धत होती. मात्र शहरीकरणासोबतच या चुलीची जागा घरगुती गॅसने घेतली आहे. कोणताही पदार्थ पटकन करायचा असल्याच गॅस अत्यंत उपयोगी पडतो. परंतु, घरात गॅस सिलेंडर वापरत असताना त्याची योग्य ती काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. चला तर मग पाहुयात गॅस सिलेंडरचा वापर कसा करावा व त्याची काळजी कशी घ्यावी.

१. जर तुमच्याकडे दोन गॅस सिलेंडर असतील तर ते एकाच खोलीत ठेवू नये. दोन्ही एकमेकांपासून दूर ठेवावेत.

२. सिलेंडरच्या तळाकडून आणि वरच्या बाजूने कायम हवा खेळती ठेवावी.

३. गॅस एजन्सीकडून जेव्हा सिलेंडर येतो तेव्हा त्यावरील एक्सपायरी डेट तपासून घ्यावी.

४. सिलेंडर कायम उभा ठेवावा. त्याला आडवा पाडून ठेवू नये. तसंच एकदा सिलेंडर एका जागेवर ठेवल्यानंतर त्याला सतत हलवू नये.

५. सिलेंडर कायम कोरड्या आणि थंड जागी ठेवावा. तसंच त्याला तेल, रॉकेल, शेगडी, स्टोव्ह यांच्या जवळ ठेऊ नये.

६. सिलेंडरच्या जवळपास हिटर, ओव्हन, फ्रिज यासारखी उष्णता निर्माण करणारी उपकरणे ठेऊ नयेत.

७. सिलेंडरच्या रबरी नळीला गरम भांडी किंवा तवा यांचा स्पर्श होऊ नये याची काळजी घ्यावी.

८. सिलेंडरचा अप्लायन्स विजेची वायर, बटण, प्लग पॉइंट यांपासून एक मीटर दूर असावे.

९. गॅसचा बर्नर कायम स्वच्छ ठेवावा. तसंच त्यावर कोणताही पदार्थ सांडू नये.

१०. गॅसच्या रबरी वायर खराब झाल्यास किंवा त्यावर चिरा दिसल्यास ती त्वरीत बदलून घ्यावी.

११.रेग्युलेटर नॉझल व अप्लायन्स नॉझल एकाच मापाची असल्याची खात्री डिलरकडून करून घ्यावी.

१२. घरातून बाहेर जातांना किंवा रात्री झोपण्यापूर्वी सिलेंडरची कॅप फिरवून गॅस बंद करावा.