सोशल मीडियावर करोना व्हायरसबाबत पसरणाऱ्या अफवांमुळे लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने मोठा निर्णय घेतलाय. WhatsApp ने मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा घातली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर आतापर्यंत एखादा मेसेज एकावेळी पाच जणांना फॉरवर्ड करता येत होता. पण आता कंपनीने यामध्ये बदल केला आहे. सतत फॉरवर्ड होणारे मेसेजेस रोखण्यासाठी नवीन मर्यादा कंपनीने घातली आहे. यानुसार, एखादा मेसेज तुम्ही एकदा पाच जणांना फॉरवर्ड करु शकाल, पण त्यानंतर मात्र जर तोच मेसेज तुम्हाला पुन्हा फॉरवर्ड करायचा असेल तर तुम्ही केवळ एकाच व्यक्तीला तो फॉरवर्ड करु शकणार आहात. पुढील अपडेटपासून मेसेज फॉरवर्डची ही नवी मर्यादा लागू होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, गेल्या महिन्यापासून WhatsApp एक खास फीचर आणायची तयारी करत आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू असून लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट केले जाईल, अशी माहिती WABetaInfo द्वारे देण्यात आली आहे. या फीचरद्वारे फॉरवर्डेड मेसेज WhatsApp मध्येच अगदी सहजपणे क्रॉसचेक करता येतो. नव्या फीचरमध्ये मेसेजच्या समोर एक ‘मॅग्निफाइंग ग्लास’चा आयकॉन युजर्सना दिसेल. या आयकॉनवर टॅप करुन संबंधित मेसेज खरा आहे की नाही हे क्रॉसचेक करता येईल. पण, अनेकदा फॉरवर्ड झालेले मेसेजच (frequently forwaded messages)या फीचरद्वारे क्रॉसचेक करता येतील. कंपनीकडून बीटा युजर्ससाठी हे फीचर हळुहळू रोलआउट केलं जात असल्याचं समजतंय. गेल्या आठवड्यात अनेक बीटा युजर्सना हे फीचर टेस्टिंगसाठी देण्यात आलं असून टेस्टिंगनंतर सर्व युजर्सना स्टेबल अपडेटमध्ये हे फीचर मिळेल अशी शक्यता आहे.