दूरचित्रवाहिन्यांप्रमाणे मोबाइलच्या प्ले-स्टोअरवरील विविध अॅप्लीकेशन परवान्याच्या कक्षेत आणण्याचा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा(ट्राय) विचार आहे. हॉटस्टार, एअरटेल टीव्ही, सोनी लाइव्ह,अशा वेब अॅप्सना परवान्याच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव ट्रायच्या विचाराधीन आहे. ‘ट्राय’ने काही महिन्यांपूर्वीच टीव्ही चॅनलचे दर स्वस्त करताना नवे टॅरिफ दर जारी केले होते, त्यानंतर आता ट्रायने मोबाइल अॅप्लीकेशनद्वारे टीव्ही चॅनल्सचं प्रसारण करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. या वेब अॅपना ओव्हर द टॉप (ओटीटी) असे म्हटले जाते.

प्रेक्षकांना टीव्ही चॅनलवरील कार्यक्रम पहाता यावेत यासाठी ओटीटी हे एक नवे माध्यम आहे. ओटीटी अॅपद्वारे दाखवल्या जाणाऱ्या चॅनल्सवर सध्या कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाहीये. अनेक अॅप्स मोफत आहेत. याबाबत ‘फायनान्शिअल एक्सप्रेस’शी बोलताना, ट्रायच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की केबल ऑपरेटर किंवा उपग्रह कंपन्यांना टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी सेवा पुरवठादारांकडून कंटेट पुरवला जातो. त्यासाठी निर्धारित शुल्कही आकारलं जातं, सेवा पुरवणाऱ्यांना संबंधित नियम पाळावे लागतात. मात्र, वेब अॅपवर कोणाचंही नियंत्रण नाहीये, ते कोणत्याही शुल्काशिवाय टीव्ही चॅनेलचे तसेच, वेब मालिकांचे प्रसारण करतात. त्यामुळे या अॅप्सनाही ट्रायच्या कक्षेत आणणे शक्य आहे का, यावर विचार सुरू आहे.’

परिणामी, लवकरच नियंत्रणमुक्त असणाऱ्या वेब अॅपमधून प्रसारित होणारा कंटेंट ट्रायच्या देखरेखीखाली येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ट्रायच्या या प्रस्तावाला वेब अॅप कंपन्यांकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.