Vivo कंपनीने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Vivo Y1s भारतामध्ये लाँच केला आहे. आठ हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला हा नवीन फोन कंपनीने दोन रंगांच्या पर्यायात आणला आहे. वॉटरड्रॉप डिस्प्ले, ग्लॉसी रिअर पॅनल आणि सिंगल रिअर कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक Helio P35 प्रोसेसर, 6.22 इंच डिस्प्ले आणि 4030mAh बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

किंमत :-
Vivo Y1s ची किंमत 7,990 रुपये इतकी ठेवण्यात आली असून ऑरोरा ब्लू आणि ऑलिव ब्लॅक अशा दोन रंगांचे पर्याय फोनसाठी आहेत. Vivo च्या फोनवर रिलायन्स जिओकडून लॉक-इन ऑफरही आहे. या ऑफरमध्ये युजर्सना 249 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज केल्यास 4,550 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळतील. याशिवाय 99 रुपयांत 90 दिवसांसाठी Shemaroo OTT सबस्क्रिप्शन आणि OneAssist च्या माध्यमातून वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट यांसारख्या ऑफर्सही आहेत.

स्पेसिफिकेशन्स :-
Vivo Y1s मध्ये 6.22 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक Helio P35 प्रोसेसर असून अँड्रॉइड 10 वर आधारित FunTouch OS 10.5 वर हा फोन कार्यरत आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनचं स्टोरेज माइक्रो-एसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. फोनच्या मागील बाजूला 13 मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा असून त्यासोबत LED फ्लॅश आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही मिळेल. याशिवाय 4030mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये असून कनेक्टिव्हिटीसाठी 3.5mm हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी माइक्रो-युएसबी पोर्ट मिळेल.