लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp सातत्याने नवनवे फीचर्स आणत आहे. आता कंपनीने तीन नवे फीचर्स आणले असून या फीचर्समुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना काही मोठे बदल जाणवतील. नव्या अपडेटमध्ये पहिलं फीचर ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यासंदर्भात आहे. दुसरं फीचर रिमाइंडर, तर तिसरं फीचर कॉल वेटिंगशी निगडीत आहे. जाणून घेऊया तिन्ही फीचर्सबाबत –

ग्रुप इनव्हाइट फीचर –
तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे हैराण झाला असाल आणि तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करु नये अशी तुमची इच्छा असेल तर आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण अखेर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हे फीचर आलं आहे. WhatsApp च्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी पर्याय निवडल्यानंतर ग्रुप्स हा पर्याय निवडावा. त्यात तुम्हाला Who can add me to groups (ग्रुपमध्ये कोणी अ‍ॅड करावं) हा पर्याय दिसेल. येथे तुम्ही Everyone, my contacts आणि my contacts except यापैकी एक पर्याय निवडू शकतात.

WhatsApp रिमाइंडर फीचर
WhatsApp मध्ये आता तुम्हाला आवश्यक कामांचं रिमाइंडर मिळेल. या फीचरद्वारे युजर्सला कोणतीही टास्क सेट करता येईल. या टास्कबाबत तुम्हाला रिमाइंडर मिळेल. तुम्हाला एका थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवरच महत्त्वाच्या कामाचे Reminder मिळतील. यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Any.do हे अ‍ॅप असणं आवश्यक आहे. हे अ‍ॅप WhatsApp अकाउंटशी जोडावं लागेल. तुम्ही सेट केलेलं रिमाइंडर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्टला फॉरवर्ड देखील करता येणार आहे. मोबाइलमध्ये काहीही ‘टास्क क्रिएट’ केल्यास तुम्हाला रिमाइंडर हवंय की नाही याबाबत विचारणा केली जाईल. त्यानंतर ठरवलेल्या वेळेवर तुम्हाला WhatsApp द्वारे रिमाइंडर मिळेल. मात्र हे अ‍ॅप मोफत नाहीये, यासाठी Any.do चं प्रीमियम सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल.

कॉल वेटिंग फीचर
या फीचरनंतर युजर कोणताही कॉल मिस करणार नाहीत. आता युजर्सना WhatsApp कॉल दरम्यानच कॉल वेटिंग नोटिफिकेशन मिळेल. हे फीचर व्हिडिओ कॉलिंगसाठीही वापरता येईल. व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (VoIP) ही सेवा सुरू केली असून यामुळे अँड्रॉइड वापरकर्ते आता सामान्य मोबाइल कॉलप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवरही वेटिंग कॉल पाहू शकणार आहेत. प्ले स्टोरवर आता व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केलं तर हे नवं फीचर युजर्सला वापरता येणार आहे. कॉल वेटिंग हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या v2.19.352 किंवा यावरील व्हर्जनवर उपलब्ध आहे. व्हॉइस कॉलिंगसह व्हिडिओ कॉलिंगसाठीही या फीचरचा वापर करता येणार आहे. याआधी व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर जर तुम्ही इतरांसोबत बोलत असाल तर दुसरा कोणाचा कॉल येतोय हे कळत नव्हतं. पण, आता दुसरा कॉल वेटींगवर असल्याचं दिसेल.मात्र, अद्याप ‘कॉल होल्ड’वर ठेवण्याचं फीचर व्हॉट्सअ‍ॅपवर आलेलं नाही.