12 July 2020

News Flash

World Environment Day 2018 : पर्यावरण दिनाला तुम्ही करु शकता हे संकल्प…

पर्यावरण दिनाला नेमके काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. अशांसाठी काही सोपे पर्याय

पर्यावरण दिन आला की आपल्यातील अनेकांना पर्यावरणाबाबत अचानक काळजी वाटायला लागते. वर्षभर याच पर्यावरणाचा ऱ्हास कऱणारे आपण या दिवशी मात्र पर्यावरणाविषयी बोलू,लिहू लागतो. मात्र त्याही पलिकडे जात प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे याचे आपल्याला नक्कीच भान आहे. पण कृती म्हणजे नेमके काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. यामध्ये झाडे लावायची आहेत पण कुठे आणि कशी? प्रदुषण रोखण्यासाठी मी काय करु शकतो किंवा शकते? यांसारखे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्यादृष्टीने करता येतील असे काही उपाय पाहूयात. जेणेकरुन आपला पुढील काळ काही प्रमाणात सुकर होऊ शकेल आणि येणाऱ्या पिढीला किमान चांगले वातावरण अनुभवायला मिळेल.

१. पर्यावरण दिनाला झाडे लावायला हवीत असे आपण अनेक ठिकाणी ऐकतो, वाचतो. आता शहरी वातावरणात इमारती आणि दुचाकींच्या गराड्यात राहणाऱ्या आपल्याला झाडे लावायची खूप इच्छा असते पण ती कशी आणि कुठे लावावीत याबाबत आपल्याला माहित नसते. ज्येष्ठ अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांनी कुठे कोणती झाडे लावता येतील याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, मंदिराभोवती वड, उंबर, पिंपळ ही झाडे लावल्यास चांगली. उद्यानात पारिजातक, करंज, चिंच, सप्तपर्णी, शिसव ही झाडे लावू शकता. हवा स्वच्छ ठेवतील अशी झाडे पळस, गुलमोहर, कदंब, पेरु, बोर, कडूनिंब, आवळा, बेल, जांभूळ, आवळा इत्यादी.

२. प्लास्टीकबंदी जाहीर होऊनही आपल्यातील अनेक जण सर्रास प्लास्टीकच्या पिशव्या, चहाचे ग्लास आणि इतर अनेक गोष्टी वापरतात. मात्र प्रत्येकाने आपल्यापुरते तरी मी प्लास्टीक वापरणार नाही असे ठरवल्यास मोठ्या प्रमाणात प्लास्टीकचा वापर कमी होऊ शकतो.

३. सध्या शहरात आणि ग्रामीण भागातही दुचाकी आणि चारचाकी वापरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशिष्ट शहरातील प्रदुषणाची आकडेवारी पाहून आपण तेवढ्यापुरते आश्चर्य व्यक्त करतो, मात्र पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे होऊन जाते. त्यामुळे वाहतुकीच्या सार्वजनिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करा. तसेच शक्य असेल त्याठिकाणी चालत जा. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होऊन पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल.

४. घरातील ओला कचरा साठवून त्यापासून खतनिर्मिती करता येते. त्याविषयी हल्ली अनेकठिकाणी सहज माहिती मिळते. सोसायटीमध्ये एकत्रित मिळून हा प्रकल्प करता येतो. अन्यथा अगदी लहानशा जागेतही हा प्रकल्प करणे शक्य आहे. त्यामुळे घरच्या घरी खत तयार करुन कुंडीतील फुलांच्या रोपांसाठी हे खत तुम्ही वापरु शकाल.

५. येत्या काळात जे युद्ध होईल ते पाण्यावरुन असेल असे आपल्या कानावर पडत आहे. त्यामुळे आपल्या देशात, राज्यात आणि गावात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी पाण्याचा जपून वापर करा. अनावश्यक ठिकाणी पाणी वापरु नका. वीजेच्या बाबतीतही ही गोष्ट लागू होते. वीजनिर्मितीची प्रक्रिया खर्चिक आणि दिर्घकालिन असल्याने तसेच त्याचे स्त्रोत मर्यादीत असल्याने वीजेचाही जपून वापर करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2018 12:18 pm

Web Title: world environment day individual resolution on occasion of environment day different options to avoid pollution
Next Stories
1 TOP 10: काजवे पाहायचेत?, ही आहेत मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील दहा ठिकाणे
2 Mahindra Scorpio : खिशाला परवडणाऱ्या दरात करा स्कॉर्पिओचा कायापालट
3 जनऔषधी केंद्रात दहा रुपयांत चार सॅनिटरी नॅपकिन
Just Now!
X