प्रेमाची सुरुवात करायची असली की लोकांच्या डोक्यात सर्वात आधी हवं हवसं वाटणारं प्रेम, रोमान्स आणि गोड गुलाबी जगाची फिलिंग येऊ लागते. पण सत्य यापेक्षा काही वेगळंही असू शकतं. पण प्रत्येकालाच प्रेम मिळतंच असं नाही. कधी कधी खरंच आपल्याला नात्यातील उणीवा दिसतही नसतात आणि पाहायच्या देखील नसतात. पण हे चुक आहे. कारण आपल्या या अॅडजस्ट करण्याच्या सवयीमुळे फक्त अनके जण आयुष्यभर एकतर्फी प्रेमाच्या नात्याचं ओझं घेऊन जगावं लागतं. म्हणूनच अशा नात्यात वेळीच थांबलेलं उत्तम असतं. तुम्हीही अशा एकतर्फी प्रेमात आहात का हे कसं ओळखाल? यासाठी आम्ही दिलेले मुद्दे वाचा आणि निर्णय घ्या.

‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमातला एक डायलॉग बराच गाजला. ‘एक तरफा प्यार की ताकत ही कुछ और होती है…औरों की तरह ये दो लोगो में नहीं बटती, सिर्फ मेरा हक है इस पर!’ काही जण समोरून प्रेम मिळत नाही म्हणून तर काही जण एखाद्या दबावाखाली एकतर्फी प्रेमाच्या कचाट्यात कधी सापडतात, हे कळत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या अभ्यास, करियरवर होणार नाही याची काळजी घ्या. नैराश्याच्या जाळ्यात अडकू नका. तुम्ही अशा एकतर्फी प्रेमात आहात की नाही, हे वेळीच ओळखा.

१. जेव्हा तुम्ही रिलेशनशीपमध्ये असता, तेव्हा दोघांमधील संवाद हा सर्वोत्तम मार्ग असतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराला वारंवार मेसेज पाठवता, फोन कॉल करता आणि आठवड्यात एकदा तरी तुमच्या जोडीदाराला भेटण्याचा प्रयत्न करता. पण जर हे प्रयत्न फक्त तुम्हीच करत असाल तर तुम्ही एकतर्फी नातेसंबंधात आहात. प्रत्येकवेळी जोडीदाराला पहिल्यांदा कॉल आणि मेसेज करणारे तुम्ही असाल तर तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुम्हाला प्राधान्य नाही, हे समजून जा.

२. आपल्या जोडीदाराची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि सोबतच आपल्या प्रियजनांनाही आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला सर्व जबाबदारी घ्यावी लागते. हे केवळ तणावपूर्णच नाही तर ते थकवणारं देखील असू शकतं. पण जेव्हा तुमचे मित्रपरिवार, कुटूंबीय आणि ऑफीसमधील मंडळी तुमच्या पार्टनरची चूकीची वागणूक पाहून तुमच्याकडे त्यांची मत मांडतात आणि त्यावर तुम्ही कायम पांघरून घालत असाल. याचाच अर्थ तुमचे मित्र परिवार आणि कुटूंबीयांनी तुमच्या पार्टनरमध्ये असं काही तरी पाहिलेलं असेल जे तुम्ही कधी पाहिलं नसेल. तसंच तुमच्या नात्याची प्रतिष्ठा जपण्याची गरज फक्त तुम्हालाच आहे, तुमच्या जोडीदाराला नाही.

३. तुमची कोणतीच चूक नसली तरीही नेहमीच तुम्हीच माफी मागणारे आहात का? मग ते एकतर्फी नात्याचे सर्वात मोठं लक्षण आहे. जर तुम्ही एकतर्फी नातेसंबंधात असाल, तर तुमचा जोडीदार तुम्हाला कायम तुमची कोणतीही चूक नसली तरी प्रत्येक गोष्टींसाठी तुम्हाला वाईट वाटण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत असतो.

४. जर तुम्ही एकतर्फी नातेसंबंधात असाल तर तुमचा जोडीदार तुमची फारशी काळजी घेणार नाही आणि तुमच्यासाठी त्यांच्याकडे तसा फारसा वेळही नसणार. तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल तरीही त्याबद्दल त्यांना कधीच चिंता वाटणार नाही किंवा काही असल्यास ते जाणून घेण्याची सुद्धा तसदी घेणार नाहीत. तुमच्या जोडीदाराला तुमची पर्वा नाही, अशी भावना तुम्हाला जर येत असेल ते एक लक्षण आहे.

५. कोणतेच नातेसंबंध हे परिपूर्ण नसतात. प्रत्येकाच्या नात्यात काही ना काही समस्या उद्भवतात. त्यावर मात करण्यासाठी दोघांनाही खूप मेहनत घ्यावी लागते. पण जर तुमचा जोडीदार नात्यातील समस्या सोडवण्यासाठी स्वारस्य दाखवत नसतील आणि त्याऐवजी ते पळ काढताना दिसून येत असतील तर तुम्ही एकतर्फी नातेसंबंधात आहात. तुमचे नातेसंबंध तुटण्याच्या उंबरठ्यावर आहेत आणि तरीही तुम्ही जोडीदारासाठी चिंता करत असाल तर ती तुमची चूक आहे.