Heart Disease Prevention Tips: भारत आज हृदयविकारग्रस्तांच्या महासंकटात सापडला आहे. देशातील मृत्यूंचं सर्वांत मोठं कारण म्हणजे हृदयविकार आणि आता हा आजार फक्त वृद्धांना किंवा जास्त वजन असलेल्या लोकांनाच होत नाही, तर तरुण धडधाकट वाटणाऱ्या रुग्णांचीही त्यात भर पडताना होताना दिसते. जिममध्ये वर्कआउट करताना कोसळणारे युवक, स्ट्रेसमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येणारे ऑफिसगोअर्स या सगळ्या घटना एका मोठ्या समस्येकडे निर्देश करतायत.
प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. श्रीराम नेने यांनी या वाढत्या संकटामागचं खरं कारण उघड केलं आहे ते म्हणजे आपलं ‘Always On’ असलेलं जीवन. डिजिटल युगात आपण सतत स्क्रीन, सूचना (notifications) आणि ताण यांच्या भोवऱ्यात अडकलो आहोत आणि याचाच दुष्परिणाम आपल्या हृदयावर होत आहे.
डॉ. नेने म्हणतात, “बसून राहणं हे आजचं नवं ‘धूम्रपान’ बनलं आहे.” नवीन ICMR–INDIAB अहवालानुसार, भारतातील ३७% प्रौढ लोक पुरेशी शारीरिक हालचाल करीत नाहीत. केरळमध्ये झालेल्या एका अभ्यासात लोक दिवसाला ३०० मिनिटे म्हणजे तब्बल पाच तास बसून राहतात आणि त्यामुळे पाच वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये २८% वाढ दिसून आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२४ च्या अहवालात दक्षिण आशिया हा जगातील सर्वांत कमी सक्रिय प्रदेश ठरला आहे. एकंदरीत जवळपास अर्धी लोकसंख्या निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. नेने यांना, ‘Notification Tachycardia‘ हा शब्द वापरावा लागला. कारण- मोबाईलवरील सततच्या नोटिफिकेशन्समुळे लोक ९० पेक्षा जास्त resting heart rate, वाढलेला cortisol (stress hormone) आणि अस्वस्थ झोप अशा लक्षणांनी डॉक्टरांकडे येत आहेत. शरीर सतत ‘alert mode’ मध्ये राहतं आणि त्यामुळे हळूहळू हृदय आणि रक्तवाहिन्यांवरील ताण वाढत जातो.
ताण केवळ मानसिक नाही, तर जैवरासायनिकही आहे. भारतीय अभ्यासांनुसार १० नॅनोग्रॅम प्रति मिलिलिटरपेक्षा जास्त cortisol असलेल्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल यांचे दुप्पट प्रमाण आढळते.
डॉ. नेने सांगतात, “नियमित व्यायामाइतकंच महत्त्वाचं म्हणजे उर्वरित २३ तास शरीर काय करतंय हे बघणं.” प्रत्येक तासाला एक मिनीट चालणं, कामाच्या फोन कॉलदरम्यान चालणं, झोपण्याच्या एक तास आधी स्क्रीन बंद करणं हे छोटे बदल मोठा फरक घडवू शकतात.
त्यांच्या म्हणण्यानुसार, INDIA-WORKS या संशोधनात अशा छोट्या बदलांनी १८ महिन्यांत रक्तातील साखर (HbA1c) आणि रक्तदाब दोन्ही कमी झाले.
शेवटी डॉ. नेने सांगतात, “आपलं हृदय एका दिवसात नाही, तर दररोजच्या सवयींनी वाचतं किंवा तुटतं. उपाय चमत्कारी नाही; पण तो रोजच्या सवयींवर अवलंबून आहे.”