भारतातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉननं भारतातील आपली ‘प्राईम नाव्ह’ ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रॉसरी डिलिव्हरीसाठी अॅमेझॉननं ही सेवा सुरू केली होती. यावर ग्रॉसरी व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक, घरातलं आणि अन्य सामानदेखील ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. तसंच केवळ दोन तासांमध्ये ग्राहकांपर्यंत सर्व वस्तू पोहोचवण्याचा दावा कंपनीकडून करण्यात येतो. प्राईम नाव्ह हे केवळ प्राईम सेवा घेतलेल्या ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे.
दरम्यान, या सेवेला मिळणारा प्रतिसाद आणि खराब कामगिरी पाहता कंपनीनं ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१६ मध्ये Amazon Now या नावानं ही सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीनं याचं नाव बदलून Prime Now असं केलं होतं.
औपचारिक घोषणा होणं बाकी
सध्या कंपनीकडून ही सेवा बंद करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली नाही. परंतु अॅमेझॉन प्राईम नाव्ह सपोर्ट लवकरच बंद होणार आहे, असा मेसेज अनेकांच्या स्क्रीनवर दिसत आहे. ही सेवा आता Amazon Fresh या नावानं दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे Amazon Fresh?
Amazon Fresh हे कंपनीच्या मुख्य अॅपमध्ये असलेले एक ग्रॉसरी स्टोअर आहे, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीनं Amazon Fresh लॉन्च केलं होतं. सध्या याची सेवा केवळ बंगळुरू या शहरापुरती मर्यादित होती. परंतु आता ती मुंबई, दिल्ली एनसीआर, हैदराबादरसह सहा शहरांमध्ये सुरू केली आहे.