Appendix Cancer symptoms: आजच्या धावपळीच्या जीवनात, आहारापासून जीवनशैलीपर्यंत सर्व काही बदलले आहे, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्याचप्रमाणे कर्करोग आता अधिकाधिक लोकांना प्रभावित करीत आहे. तरुणांमध्येही कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कर्करोग हा एक जीवघेणा आजार मानला जातो, जो एकदा झाला की, बाधित केलेल्या भागासह हळूहळू शरीराच्या इतर अवयवांनाही तो कवटाळत, त्यांना कमकुवत करू लागतो. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट डेटाबेसच्या विश्लेषणानुसार, जुन्या पिढ्यांच्या तुलनेत हल्लीच्या नवीन पिढीतील लोकांमध्ये अपेंडिक्स कर्करोगाचे प्रमाण तिप्पट आणि मिलेनियल लोकांमध्ये चौपट वाढल्याचे संशोधकांना आढळून आले. हा अहवाल अॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला.
एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, वँडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर आणि वँडरबिल्ट इंग्राम कॅन्सर सेंटरमधील हेमॅटोलॉजी व ऑन्कोलॉजीच्या सहायक प्राध्यापक व अभ्यासाच्या प्रमुख लेखिका अँड्रियाना होलोवाटिज यांनी सांगितले की, तरुणांमध्ये अपेंडिक्स कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. अपेंडिक्स कर्करोगाचे तीनपैकी एक निदान ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्रौढांमध्ये होते. एकेकाळी ही शस्त्रक्रिया किरकोळ मानली जायची. परंतु, दुर्लक्षित केली गेलेली ही अॅपेंडिसाइटिसची समस्या आता एक नवीन आरोग्य आव्हान म्हणून उदयास येत आहे.
अमेरिकन आणि युरोपियन अभ्यासातून असे आढळून आले आहे की, गेल्या दशकात २० ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये अपेंडिक्स कर्करोगाचे प्रमाण २०-३०% वाढले आहे. त्याची मुख्य कारणे म्हणजे अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न आणि पाश्चात्त्य आहार, जीवाणूंचे असंतुलन, आनुवंशिक उत्परिवर्तन, हार्मोनल बदल आणि दीर्घकालीन दाह इत्यादी.
अपेंडिक्स कर्करोग म्हणजे काय?
अपेंडिक्स कर्करोग हा आतड्याच्या शेवटी असलेल्या लहान थैलीचा एक दुर्मीळ, परंतु वेगाने वाढणारा कर्करोग आहे. जेव्हा या अवयवातील पेशी असामान्यपणे वाढू लागतात तेव्हा हा कर्करोग होतो. सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे खूप सौम्य असतात किंवा अॅपेंडिसाइटिससारखी दिसतात.
अँड्रियाना होलोवाटिज म्हणाल्या की, राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणाऱ्या कर्करोग नोंदणी संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यामध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येच्या अंदाजे ४५.९% लोक समाविष्ट आहेत. १९७५ ते २०१९ पर्यंत अपेंडिक्स कर्करोगाचे ४,८५८ रुग्ण आढळले. होलोवाटिज म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला अपेंडिसाइटिस आहे आणि अपेंडिक्स काढून पॅथॉलॉजिस्टकडून तपासणी केली जात नाही तोपर्यंत सुमारे ९५% अपेंडिक्स कर्करोग आढळत नाहीत. ते म्हणाले की, यामुळे कर्करोगाचे निदान उशिरा होते आणि उपचारांना विलंब होतो.
त्या म्हणाल्या की, तरुणांमध्ये अपेंडिक्स कर्करोगाचे वाढते प्रमाण ही गंभीर चिंतेची बाब आहे. आता ते हलक्यात घेणे धोकादायक ठरू शकते. चुकीची जीवनशैली, प्रक्रिया केलेले अन्न आणि लक्षणांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याने ही समस्या उदभवू शकते. म्हणून जर पोटदुखी किंवा अपचन यांसारखी लक्षणे कायम राहिली, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अपेंडिक्स कर्करोगाची लक्षणे
- उजव्या बाजूला पोटात सतत दुखणे
- सतत बद्धकोष्ठता वा जंत होणे
- थकवा आणि अॅनिमिया
- पोटात सतत सूज येणे
- अचानक वजन कमी होणे
अपेंडिक्स कर्करोगाचा प्रतिबंध आणि उपचार?
अपेंडिक्स कर्करोग बहुतेकदा लक्षणांशिवाय पसरतो. म्हणून त्याची लक्षणे लवकर ओळखणे महत्त्वाचे आहे.
नियमित आरोग्य तपासणी, सीटी स्कॅन किंवा एंडोस्कोपी यांसारख्या चाचण्यांद्वारे लवकर निदान शक्य आहे.
कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून असलेल्या अपेंडेक्टॉमी या शस्त्रक्रियेत केमोथेरपी किंवा रेडिएशनद्वारे उपचार केले जातात.