स्मार्टफोन, लॅपटॉप निर्मिती क्षेत्रात वारंवार नवेनवे प्रयोग करत अनेक वैशिष्ट्यपूर्ण फिचर्स आणणाऱ्या अॅपलबाबत कायमच जगभरातील तंत्रप्रेमींना उत्सुकता असते. अॅपल कंपनी कायमच नव्या फिचर्सवर काम करत असते. अॅपलकडून आणले जाणारे अनेक फिचर्स अतिशय नावीण्यपूर्ण असतात. अशाच काही नव्या फिचर्स असलेल्या उत्पादनांची घोषणा अॅपलकडून करण्यात आली आहे. अॅपलचा सर्वात मोठा डेव्हलपर कार्यक्रम डब्ल्यूडब्ल्यूडीसी २०१७ कॅलिफोर्नियामध्ये संपन्न झाला. यामध्ये अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांच्यासोबतच कंपनीचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयफोन, मॅकबुक, अॅपल टीव्ही, अॅपल वॉच यांच्यासोबतच अनेक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची घोषणा करण्यात आली.

आयओएस ११
अॅपलने नवीन ऑपरेटिंग सिस्टिम iOS 11 आणण्याची घोषणा केली आहे. यामध्ये अॅप ड्रॉर नावाचे फिचर देण्यात येणार आहे. यामुळे वापरकर्त्यांना अॅप्स वेगाने वापरता येतील. यासोबतच हे फिचर iCloud सोबत इंटिग्रेट करता येईल. यासोबत सीरी प्लॅटफॉर्मवर नवीन व्हिजुअल इंटरफेस जोडण्यात आले आहे. यामध्ये भाषांतरासाठी नवे फिचर देण्यात आले आहे.

आयपॅड प्रो
अॅपलने १०.५ इंचाच्या डिस्प्लेसह iPad Pro लॉन्च केला आहे. नव्या iPad Pro चा डिस्प्ले आधीच्या तुलनेत जास्त चांगला आहे. यामध्ये ६०० निट्स ब्राईटनेस आणि हाय डेफिनेशन व्हिडिओ प्लेबॅकची सुविधा देण्यात आली आहे. iPad Pro मध्ये अॅपल पेन्सिलचा वापरदेखील करता येणार आहे. यामध्ये A10X Fusion CPU सोबत GPU देखील देण्यात आला आहे. मागील CPU च्या तुलनेत याची क्षमता ४० टक्क्यांनी जास्त आहे.

नव्या iPad Pro ची बॅटरी क्षमता १० तास असणार आहे. यामध्ये १२ मेगापिक्सल कॅमेरा असेल. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ४ के रेजोल्युशन व्हिडिओ रेकॉर्ड करता येणार आहे. iPad Pro चा फ्रंट कॅमेरा ७ मेगापिक्सलचा असणार आहे. iPad Pro च्या दोन्ही मॉडेल्समध्ये (१०.५ इंच आणि १२.९ इंच) ६४ जीबीची स्टोरेज क्षमता आहे. १०.५ इंच डिस्प्ले असलेल्या मॉडेलची किंमत ६४९ डॉलर म्हणजेच जवळपास ४२ हजार रुपये, तर १२.९ इंच डिस्प्ले असलेल्या मॉडेलची किंमत ७९९ डॉलर म्हणजेच जवळपास ५१ हजार रुपये असणार आहे.

आयमॅक
अॅपलकडून iMac लॉन्च करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. नवा iMac २७ इंचाचा असणार आहे. यासोबतच iMac मध्ये ५ के रेटिना असेल. यामध्ये ८ जीबी VRAM असणार आहे. नव्या iMac चा डिस्प्ले आधीच्या तुलनेत जास्त चांगला असून वाढवण्यात आलेली मेमरी आणि वेगवान प्रोसेसर महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. २१.५ इंच डिस्प्ले असलेल्या iMac ची किंमत १०९९ डॉलर म्हणजेच जवळपास ७० हजार ७०० रुपये, २७ इंच डिस्प्ले असलेल्या iMac ची किंमत १,७९९ डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख १६ हजार रुपये असणार आहे. अॅपलच्या सात लॅपटॉपमध्ये आता ‘केबी प्रोसेसर्स’ असणार आहे.

आयमॅक प्रो
नवा iMac Pro मध्ये १८ कोअर जियॉन प्रोसेसर असणार आहे. आतापर्यंतच्या सर्व iMac च्या तुलनेत हा प्रोसेसर सर्वाधिक वेगवान असणार आहे. यामध्ये १६ जीबी VRAM असणार आहे. यामध्ये ४ टेराबाईट मेमरी क्षमता असणार आहे. iMac Pro यंदाच्या डिसेंबरमध्ये बाजारात येईल. iMac Pro ची किंमत ४ हजार ९९९ डॉलर, म्हणजेच ३ लाख २१ हजार रुपये असणार आहे.