स्वयंपाक घरात जेवण बनवताना भाज्यांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या गरम मसाल्यांचा वापर केला जातो. मग तो मसाला अख्खा खडा मसाला असो किंवा बारीक पावडर केलेला मसाला. पण तुम्हाला हे माहीत आहे का? की, गरम मसाला जेवणाची चव आणि सुगंध वाढवतोच पण त्याच बरोबर गरम मसाल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत. जसे गरम मसाल्यांचे आरोग्यासाठी फायदे आहेत तसेच काही विशिष्ट परिस्थितींमध्ये या मसाल्यांमुळे शारीरिक नुकसान देखील होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात या गरम मसाल्यांचे फायदे आणि नुकसान.

सर्दी आणि खोकल्यासाठी

पावसाळ्याच्या दिवसात सर्दी आणि खोकला होणे हे सामान्य झालं आहे. तुम्हाला जर सर्दी खोकला झाला असेल आणि त्यात डॉक्टरांकडून मिळालेल्या कडू गोळ्या खायला आवडत नसेल तर तुम्ही घरात लवंग, काळीमिरी, दालचीनी यांचा काढा किंवा चहा तयार करा. तयार केलेला काढा घेतल्याने तुम्ही सर्दी खोकला या समस्येपासून मुक्त व्हाल. तसेच कोथिंबीर मध्ये भरपूर प्रमाणात झिंक असल्याने तुमच्या जेवणात कोथिंबीरचा समावेश करा. यामुळे सर्दी, खोकल्याच्या समस्येवर मात करण्यास देखील मदत होते.

पचनक्रिया सुधारण्यासाठी

पावसाळ्यात आपण सगळेजण मस्तपैकी गरमा गरम भजीसारखे असे तेलकट पदार्थ आवडीने खात असतो. त्यात पावसाळ्यात आपली पचन क्रिया मंदावलेली असल्याने अशाने खाद्य पदार्थाने पचन क्रिया बिघडणे सामान्य झाले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही गरम मसाल्यांची मदत घेऊ शकता. कारण गरम मसाल्यांमध्ये असलेल्या फायबरचे घटक तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करेल. यासाठी तुमच्या रोजच्या आहारात गरम मसाल्यांचा आवर्जून वापर करा.

वेदना आणि सूज कमी करण्यासाठी

गरम मसाल्यांमध्ये एंटी इन्फ्लेमेटरी (दाहक-विरोधी) गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरात वेदना होणे तसेच सूज येणे अशा समस्या कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावतात. याचबरोबर शरीरात होणार्‍या तीव्र वेदना कमी करण्यास देखील मदत करतात. गरम मसाल्यांचा वापर पोटातील सूज कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

मधुमेहासाठी

गरम मसाले हे मधुमेह असलेली समस्या कमी करण्यास देखील मदत करते. गरम मसाल्यांमध्ये जिरे देखील वापरले जाते. जिर्‍यामध्ये मधुमेह विरोधी एक सक्रिय एंटी डायबिटिक घटक आहे. जे मधुमेहाची लक्षणे कमी करण्याचे काम करतात.

गरम मसाल्यांमुळे होणारे नुकसान

गरम मसाल्यांचे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होत असले तरी विशेष परिस्थितीमध्ये गरम मसाल्यांच्या अति सेवनाने ते शरीराला हानी पोहोचवू शकतात. वास्तविक पाहता गरम मसाल्यांची चव खूप गरम असते. त्यामुळे त्याचं जास्त आणि सतत सेवन केल्यामुळे तुम्हाला मूळव्याध, छातीत जळजळ, आंबटपणा, पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, त्यांचे जास्त आणि सतत सेवन करणे टाळणे देखील महत्त्वाचे आहे.

(टीप: वरील टिप्सचा वापर करण्याआधी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)