केस गळणे ही आजकाल लोकांना भेडसावणाऱ्या प्रमुख आरोग्य समस्यांपैकी एक आहे. तरूण असो वा वृद्ध सर्व वयोगटातील व्यक्तींना केस गळतीच्या समस्या उद्भवतातच. केस गळती थांबवण्याचे आश्वासन देणाऱ्या असंख्य उपायांचा इंटरनेटवर सुळसुळाट आहे. असाच एक उपाय म्हणजे मखाना आणि दुधाचं झोपण्यापूर्वी एकत्रित सेवन. मात्र, हा उपाय खरंच फायदेशीर ठरू शकतो का याबाबत जाणून घेऊ…

केस गळतीवर एकच पदार्थ उपाय असू शकत नाही. याबाबत तज्ज्ञ सांगतात की, केस गळतीवर मखानासह कोणत्याही एका प्रकारच्या पदार्थाने उपाय करता येत नाहीत. कारण कोणताही एक पदार्थ केस गळतीच्या समस्येवर त्वरित उपाय देऊ शकत नाही. केसांचे आरोग्य निश्चित करणारे घटक म्हणजे ताणतणावाची पातळी, हार्मोनल बदल, झोपेची गुणवत्ता, पचनशक्ती आणि वैयक्तिक जीवनातील निवडी. यावर तज्ज्ञ सांगतात की, झोपण्यापूर्वी कोमट दुधासह मखाना खाण्याची पद्धत पूर्णपणे निरर्थक ठरेल असं नाही. कारण ती केसांच्या आरोग्यासाठी चांगली मदत करू शकते.

मखाना आणि दूध यांचे एकत्रित सेवन केल्याने केसांच्या वाढीस मदत कशी होते याबाबत तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

झोप म्हणजे दुरूस्तीचा वेळ

तज्ज्ञ सांगतात की, गरम दुधात ट्रिप्टोफॅन असते, ते झोपेला प्रोत्साहन देणारे अमिनो आम्ल असते. मखानासोबत ते एकत्र केल्यास हा हलका, उबदार आणि पौष्टिक नाश्ता झोपेची गुणवत्ता नक्कीच सुधारू शकतो.

मखाना आणि दूध यांचे एकत्रित सेवन केल्याने केसांच्या वाढीस मदत कशी होते फोटो सौजन्य: एआय

ताण आणि कॉर्टिसॉल

अनेक अभ्यासांमधून असे समोर आले आहे की, स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉलचे उच्च प्रमाण केस गळतीस थेट कारणीभूत ठरते. मखाना हे प्रथिने आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आहे. प्रथिने केसांसाठी मुलभूत घटक आहे, तर मॅग्नेशियम हे एक खनिज आहे. ते मज्जासंस्था आणि स्नायूंना आराम देण्यास मदत करू शकते.

पोषकतत्वे शरीराला मिळणे आवश्यक

केसांची वाढ शरीर पोषकतत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेते की नाही यांवर अवलंबून असते. तज्ज्ञांच्या मते, मखाना आणि वनस्पती आधारित दुधाचे मिश्रण केसांना आवश्यक पोषकतत्वे प्रदान करते. कारण मखानामध्ये अमिनो आम्ल असतात, तर वनस्पती दुधात व्हिटॅमिन ई, चांगले फॅट आणि काहीवेळा व्हिटॅमिन बी १२ आणि डी देखील असते. जेव्हा पचनसंस्था चांगल्या प्रकारे कार्य करते तेव्हा शरीर केसांच्या कूपांना चांगले पोषण देते.

दाहक-विरोधी शक्ती

तज्ज्ञांच्या मते, मखानामधील अँटीऑक्सिडंट घटक, वनस्पतीच्या दुधातील चांगल्या फॅटसह अंतर्गत दाह कमी करण्यास मदत करते आणि टाळूच्या आरोग्यास फायदेशीर ठरते.

मखाना आणि दूध हे केस गळतीसाठी त्वरित उपायकारक नाहीत, मात्र ताण, झोप, पोषकतत्वांचे शोषण आणि जळजळ यासारख्या समस्यांवर फायदेशीर ठरते. नियमित सेवनाने दीर्घकालीन केसांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.