Causes of Cancer in Youth: कर्करोग (कॅन्सर) हे नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो. एकदा झाला, की हळूहळू संपूर्ण शरीराला कुरतडत नेणारा हा आजार आज तरुणाईलाही गाठतोय. पूर्वी जिथे कर्करोग वयोवृद्धांमध्ये आढळायचा, तिथे आता २० ते ४० वयोगटातील युवक-युवतींमध्ये या आजाराची भीषण वाढ होत आहे.

ब्रिटनच्या BMJ ग्रुपच्या एका धक्कादायक अहवालानुसार, १९९९ ते २०१९ या २० वर्षांच्या कालावधीत ५० वर्षांखालील लोकांमध्ये कर्करोगाच्या रुग्णसंख्येत तब्बल ७९% वाढ झाली आहे. त्यात सर्वाधिक प्रमाण स्तनाच्या कर्करोगाचे असून, या आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्येही बहुतांश महिला ५० वर्षांखालील आहेत. त्यानंतर विंडपाइप (श्वासनलिका) आणि फुप्फुसाचा कर्करोग हे सर्वाधिक प्राणघातक ठरत आहेत.

अँड्रोमेडा कॅन्सर हॉस्पिटलचे सीनियर कन्सल्टंट डॉ. रमन नारंग सांगतात, “कर्करोग हे असं आजारपण आहे, जे आपल्या रोजच्या सवयींमुळे पसरतं. चुकीचा आहार, फास्ट फूड, ताणतणाव आणि हालचालींचा अभाव हे सर्व मिळून शरीरात अशी स्थिती निर्माण करतात की, पेशींच्या वाढीवर नियंत्रण राहत नाही आणि कर्करोग जन्म घेतो. वेळेत उपचार न मिळाल्यास हा आजार प्राणघातक ठरतो.”

डॉ. नारंग यांच्या मते, आजच्या पिढीचा फास्ट फूड आणि जंक फूडवरचा अतिविश्वास हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. बर्गर, सॉसेज, पिझ्झा यांसारख्या पदार्थांमध्ये असलेले नायट्रेट्स आणि टॉक्सिन्स शरीरात जमा होऊन विषारी परिणाम करतात. त्याशिवाय या पदार्थांतील साखर आणि अनारोग्यकारक चरबी यांमुळे शरीरात सूज निर्माण होते, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढीस लागतात.

‘या’ ३ कारणांकडे दुर्लक्ष म्हणजे धोका

१. लठ्ठपणा

अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, सर्व कर्करोगांपैकी चार ते आठ टक्के रुग्णांमध्ये लठ्ठपणा हे मुख्य कारण आढळतं. शरीरातील जास्त चरबीमुळे हार्मोनल असंतुलन होतं, सूज वाढते आणि त्यामुळे स्तन, गर्भाशय, मोठे आतडे व मूत्रपिंड या अवयवांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

२. मानसिक ताण

आजची तरुणाई जास्त तणावाखाली जगते. पबमेड सेंट्रल जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, कामाचा ताण आणि झोपेचा अभाव यांमुळे वर्क स्ट्रेस हा नव्या काळातील कर्करोगाचा मुख्य ट्रिगर ठरतोय. ताणामुळे शरीरात कॉर्टिसॉल आणि इतर हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे पेशींचं नुकसान होतं आणि कर्करोगाचं बीज पेरलं जातं.

३. शारीरिक हालचालींचा अभाव

ज्यांचं जीवन बसून राहण्याचं आहे, त्यांच्यात कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (इम्युन सिस्टीम) सक्रिय ठेवण्यासाठी दररोज व्यायाम किंवा चालणं अत्यावश्यक आहे. हालचालींचा अभाव म्हणजे शरीरात विषारी घटक साचणे आणि पेशींवर परिणाम होणे.

डॉक्टरांचा सल्ला

डॉ. नारंग म्हणतात, “आपल्या आहारात जास्तीत जास्त नैसर्गिक, ताजं आणि घरचं अन्न असायला हवं. फास्ट फूड, शीतपेये व प्रोसेस्ड पदार्थांपासून दूर राहा. तसेच, नियमित व्यायाम आणि मानसिक शांतता राखणं हाच कर्करोगापासून बचावाचा सर्वोत्तम उपाय आहे.”

कर्करोगाचं संकट आता वयावर नाही, सवयींवर अवलंबून आहे. चुकीचा आहार, वाढतं वजन आणि मानसिक ताण ही तीन कारणं जर आताच थांबवली नाहीत, तर पुढच्या दशकात तरुण पिढीला कर्करोगाचं महाभयंकर ओझं सोसावं लागू शकतं.