आफ्रिकी देशातील तंजानियामध्ये चिकनगुनिया सर्वात आधी निदर्शनास आला. त्यानंतर या रोगानं संपूर्ण जागाला विळखा घातला. प्रत्येकवर्षी या रोगामुळे हजारो लोकांचा बळी जातो. करोना विषाणूप्रमाणेच चिकनगुनियाही एक आजार असून एका विषाणूपासून याचा संसर्ग होतो.गेल्या काही वर्षांपासून सार्स, बर्ड फ्लू, डेंग्यू अशा रोगांच्या पंक्तीतच हा ‘चिकन गुनिया’ येऊन बसला आहे. ‘एडीस’ जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणारा चिकनगुनिया हा रोग एका विशिष्ट विषाणूपासून होतो.
सलग दोन-तीन दिवस ताप येतो, डोके दुखते, अंगावर विशेषतः पाठ,पोट,कंबर या भागांवर पुरळ येते आणि हातापायांचे सांधे विलक्षण दुखू लागतात. हे दुखणे अतिशय तीव्र प्रमाणात असते. पायांचे घोटे, गुडघे, तळपायांचे सांधे यांना या आजारात विशेषकरून त्रास होतो. साधे चालणे, पायांची मांडी घालणेसुध्दा वेदनाकारक होते. आजार बरा झाला तरी पुढील बराच काळ हे हात-पाय दुखणे सुरूच राहते. थकवाही अधिक जाणवत असल्याने रुग्ण बरा झाला तरी काही दिवस आराम करणे गरजेचे आहे.
चिकनगुनियाचा विषाणू हा एकाच प्रकारचा असल्याने एकदा तो झाला की व्यक्तीला दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती मिळते. त्यामुळे दरवर्षी चिकनगुनियाचा प्रभाव आढळत नाही. चिकनगुनियाची साथ साधारण दहा-बारा वर्षांनी येते, असा आजवरचा अनुभव आहे. यापूर्वी महाराष्ट्रात २००६ मध्ये चिकनगुनियाची मोठी साथ आली होती, त्यात लाखो लोकांना या आजाराने घेरले होते.
डेंग्यू आणि चिकनगुनियाचा एडीस डास मुख्यत्वे घरगुती पाणीसाठय़ात वाढणारा डास आहे. जे पाणीसाठे उघडे आहेत अशा साठय़ात, कुंडय़ा, फुलदाण्या, कारंजी, कूलरचे ट्रे, पक्ष्यांना-प्राण्यांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खोलगट जागा अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात या डासाची वाढ होते. याशिवाय खराब टायर्स, नारळाच्या करवंटय़ा, इतस्तत: पडलेले प्लास्टिकचे डबे, बाटल्या, पिशव्या, छतावर ठेवलेल्या वस्तू, अंथरलेले प्लास्टिक, झाडांचे खोलगट बुंधे, रांजण अशा एक ना अनेक ठिकाणी एडीस जन्माला येतो. अगदी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच्या उपडय़ा पडलेल्या टोपणात साचलेले पाणी जरी त्याला सात दिवसांकरिता मिळाले तरी त्यात एडीस बाळाचा जन्म होतो.
एडीस डासाची अंडी पाण्याशिवाय एक वर्षभरही टिकू शकतात. डेंग्यू आणि चिकणगुणिया नियंत्रणाचे केवळ तीनच उपाय आपल्या हातात आहेत आणि ते म्हणजे प्रभावी डास नियंत्रण, अधिक प्रभावी डास नियंत्रण आणि अत्याधिक प्रभावी डास नियंत्रण..!!!