Chronic Morning Cough: सकाळी उठल्यावर घशात खवखव, खोकल्याचा झटका आणि छातीत जडपणा अनेकांना हे रोजचं झालं आहे. “थंडीमुळे असेल”, “थोडा धूर लागला असेल”, असं म्हणत आपण ते दुर्लक्ष करतो. पण, जर हा खोकला दिवसेंदिवस वाढत असेल आणि आठवडाभर जात नसेल… तर सावधान! हा साधा सकाळचा खोकला नाही, तर शरीरात दडलेला एखादा गंभीर आजार असू शकतो, असा दिल्लीतील सीके बिरला हॉस्पिटलचे फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. विकास मित्तल यांनी इशारा दिला आहे.

डॉ. मित्तल म्हणतात, “जर सकाळचा खोकला दोन ते तीन आठवड्यांहून अधिक काळ टिकतो, तर तो एखाद्या लपलेल्या आजाराचं संकेत देत असतो. वेळेत निदान झालं तर उपचार सोपे होतात, पण दुर्लक्ष केल्यास परिस्थिती बिघडू शकते.”

सकाळच्या खोकल्यामागची लपलेली तीन कारणं:

अॅलर्जी आणि दमा (Asthma):

धूळ, परागकण, हवेतले प्रदूषक किंवा बदलणारे हंगाम यामुळे नाक किंवा श्वसनमार्गात सूज येते, त्यामुळे दररोज सकाळी खोकल्याचे झटके येतात. हे दिवसेंदिवस वाढत जाते आणि औषध घेतल्यावर थोडं सुधारतं, पण पूर्ण जात नाही.

अॅसिड रिफ्लक्स (GERD):

रात्री झोपल्यानंतर पोटातील आम्ल वर येऊन घशाला त्रास देतो, त्यामुळे सकाळी उठल्यावर घसा खवखवतो, खोकला येतो आणि आवाज बसतो.

धूर आणि प्रदूषण:

सिगारेटचा धूर, परफ्यूमचे कण किंवा शहरांमधील वाढतं प्रदूषण या सगळ्यामुळे फुफ्फुसांना सतत त्रास होतो. विशेषतः दिल्लीसारख्या शहरांमध्ये एअर पॉल्युशनमुळे सकाळचा खोकला आता सामान्य झालाय, पण त्यामागे गंभीर इशारा लपलेला असू शकतो.

कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत?

जर खोकल्यासोबत पिवळा-हिरवा कफ, रक्तमिश्रित थुंकी, श्वास घेताना घरघर, छातीत दुखणं, लांबचा ताप किंवा वजन घटणं दिसत असेल तर तो टीबी, सीओपीडी किंवा फुफ्फुसाचा कर्करोग यांसारख्या आजारांचे लक्षण असू शकतात.

डॉ. मित्तल यांचा स्पष्ट सल्ला आहे, “जर सकाळचा खोकला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतोय, तर लगेच फुफ्फुसतज्ज्ञाचा सल्ला घ्या. वेळेत निदान झालं तर आजार बरा होतो आणि गुंतागूंत टाळता येते. फुफ्फुसांच्या तज्ञ्जांशी वेळेत सल्लामसलत केल्याने खोकल्यामागचं खरं कारण ओळखता येतं आणि योग्य उपचार लवकर सुरू करता येतात. लवकर निदान झाल्यास आजार बरा होण्याची शक्यता अनेकपटीने वाढते.

थोडक्यात सांगायचं तर सकाळचा खोकला दुर्लक्षित करू नका, कारण तो शरीराचा सावधगिरीचा इशारा असू शकतो.

ही बातमी केवळ माहितीपुरती आहे. कोणतीही आरोग्यविषयक अडचण असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.