How To Cure Constipation Naturally: आजच्या धकाधकीच्या आयुष्यात चुकीच्या खाण्याच्या सवयी, जास्त ताणतणाव आणि व्यस्त दिनचर्येमुळे अनेकांच्या पचनतंत्रावर परिणाम होतो. चुकीची जीवनशैली आणि जंकफूडचे सेवन यामुळे आतड्यात मल साचणे, बद्धकोष्ठता होणे आणि पोट सतत फुगलेले राहणे अशा समस्या सामान्य झाल्या आहेत.

डॉक्टर आणि आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते, फायबरची कमतरता, पाण्याचे कमी सेवन आणि बसून राहण्याची सवय ही मुख्य कारणं आहेत, ज्यामुळे आतड्यांची गती मंदावते. अशा वेळी शरीरातील विषद्रव्यं बाहेर पडत नाहीत आणि पोट सतत जड वाटतं.

याच समस्येवर राजस्थानचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य जगदीश सुमन यांनी एक अनोखा पण प्रभावी उपाय सांगितला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर पोट नेहमीच बिघडत असेल, आतड्यात घाण साचत असेल आणि बद्धकोष्ठता कायम राहत असेल, तर तुम्ही फक्त गरम पाण्यात हे एक तेल मिसळून प्यायचं. कोणतं आहे हे जादूई तेल जाणून घेऊयात…

आयुर्वेदात कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेल हे नैसर्गिक रेचक औषध मानलं जातं. एरंडेल तेलाचे अनेक फायदे आहेत. आपल्या घरातील थोरामोठ्यांनी नेहमीच आपल्याला एरंडेल तेलाच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे. एरंडेल वनस्पतीच्या बियांपासून हे तेल काढले जाते. एरंडेल तेलामध्ये रिसिनोलिक नावाचे एक फॅटी अॅसिड असते, जे शरीरासाठी फार गुणकारी ठरते. तसेच एरंडेल तेलामध्ये इतर फॅटी अॅसिडही असतात आणि भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘ई’ असते.

यामध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याची आणि पचनशक्ती सुधारण्याची अद्भुत क्षमता आहे. सकाळी रिकाम्या पोटी एक कप कोमट पाण्यात २ ते ४ चमचे एरंडेल तेल मिसळून सेवन केल्यास काही तासांतच पोट हलकं वाटतं. आतड्यात साचलेलं मल सहज बाहेर पडतं आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात.

याशिवाय, यानंतर एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतल्यास परिणाम अधिक प्रभावी होतो. दिवसभरात पाणी नेहमी गरमच पिणं आवश्यक आहे, त्यामुळे आतड्यांची हालचाल नैसर्गिकरीत्या सुधारते.

पण सावधान! ‘हे’ तेल जास्त घेतल्यास परिणाम होऊ शकतो उलट!

तज्ज्ञांच्या मते, एरंडेल तेल मर्यादेतच घ्यावं, कारण त्याचं अति सेवन धोकादायक ठरू शकतं. जास्त प्रमाणात घेतल्यास पोटात दुखणं, उलट्या, चक्कर, छातीत जळजळ, अतिसार आणि थकवा जाणवू शकतो. काहींना त्वचेवर पुरळसुद्धा येतात.

म्हणूनच वैद्यकीय सल्ल्यानेच एरंडेल तेल नियमित घ्या. योग्य प्रमाणात घेतल्यास हे तेल आतड्यांची सफाई, पचन सुधारणा आणि गट हेल्थ मजबूत करणाऱ्या अमृतासमान उपाय ठरू शकतो.