आयुर्वेदिक डॉक्टर विनोद शर्मा म्हणाले की, जर तुम्हाला नेहमीच बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या ५ गोष्टी करा. या गोष्टी केल्याने जुनाट बद्धकोष्ठतादेखील बरी होईल आणि आतड्यांमध्ये साचलेली घाणदेखील साफ होईल. काही पदार्थ आणि सवयी पचनासाठी प्रभावी घरगुती उपाय आहेत. तर मग बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी कोणते प्रभावी उपाय आहेत ते जाणून घेऊया.
रिकाम्या पोटी प्या कोमट पाणी
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक-दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते. त्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होऊन, पोट साफ होण्यास मदत मिळते. कोमट पाणी पोटात साचलेले विषाक्त पदार्थ बाहेर काढते, गॅस व आम्लता कमी करते आणि आतड्यांना हायड्रेट करून बद्धकोष्ठतेपासून आराम देते. त्याच्या नियमित सेवनाने केवळ बद्धकोष्ठताच बरी होत नाही, तर चयापचय क्षमतादेखील वाढते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते आणि शरीर डिटॉक्स होते.
मालिश करा नाभीला
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल आणि पचनक्रिया व्यवस्थित होत नसेल, तर नाभीला मालिश करा. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नाभीला घड्याळाच्या दिशेने मालिश केल्याने आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते, ज्यामुळे पोटातील वायू, अपचन व बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. दररोज ५-१० मिनिटे नारळाच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने गोलाकार हालचालीद्वारे नाभीला मालिश केल्याने पचन सुधारते आणि पोट हलके वाटते. या कृतीमुळे पोट फुगणे व बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांना त्वरित आराम मिळेल आणि पचनसंस्था मजबूत होईल. नाभीला मालिश केल्याने आतड्यांचे रक्ताभिसरण सुधारते.
बद्धकोष्ठतेपासून मुक्तीसाठी करा प्राणायाम
बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी अनुलोम-विलोम, कपालभाती व दीर्घ श्वसन यांसारखे प्राणायाम करा. योग्य श्वास घेण्याची आणि सोडण्याची पद्धत बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. जेव्हा आपण खोलवर श्वास घेतो आणि बाहेर सोडतो तेव्हा डायाफ्राम आणि पोटाचे स्नायू सक्रिय होतात. त्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचनक्रिया वेगवान होते. हे प्राणायाम केल्याने बद्धकोष्ठता व वायूसंबंधीच्या त्रासाची समस्या कमी होते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्यामुळे शरीर आणि मनाला आराम मिळतो, ज्यामुळे ताण कमी होतो.
पाण्यात इसबगोल मिसळून प्या
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर एका ग्लास पाण्यात एक चमचा इसबगोल मिसळून घ्या. इसबगोल हे एक असे हर्ब आहे, जे आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते. इंग्रजीत त्याचे सायलियम हस्क (Psyllium Husk), असे नाव आहे. पोटाशी संबंधित समस्येमुळे त्रास होत असेल, तर इसबगोलच्या सेवनामुळे आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा इसबगोल मिसळून लगेच प्या. इसबगोलमध्ये भरपूर प्रमाणात विरघळणारे फायबर असते, जे आतड्यांमधील पाणी शोषून घेते आणि मल मऊ करते. त्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. इसबगोलच्या नियमित सेवनाने पचनसंस्था मजबूत होते आणि पोट स्वच्छ राहते.