सध्या ‘करोना’ हा परवलीचा शब्द झाला आहे. करोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. जगभरात याचीच चर्चा सुरू आहे. शिंकताना अथवा खोकताना उडणाऱ्या तुषारांतून हा व्हायरस संक्रमित होतो. जगभर झपाट्याने पसरत असलेल्या करोनाची सुरुवात चीनमधून झाली. करोनाने बघताबघता जगभरात थैमान घातले. भारतातदेखील करोना हातपाय पसरत आहे. चीनसोबतच इराण, इटली, स्पेन इत्यादी देशांना याचा मोठा फटका बसला आहे.
मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या इटली, स्पेन, इराण इत्यादी देशांमधील सार्वजनीक वैद्यकीय सेवांवर प्रचंड ताण येत आहे. सध्या करोनावर ठोस असे उत्तर उपलब्ध नसल्याने करोनाला दूर ठेवण्याची माहिती नाकरिकांपर्यंत पोहचवण्यावर आणि त्यासाठीची उपाययोजना करणावर जगभरात प्रयत्न केले जात आहेत. असे करण्यामागे करोनाच्या प्रसारावर मर्यादा आणणे आणि करोना बाधितांच्या संख्येला आळा घालणे हे उद्देश आहेत. यासाठी घरातच राहाणे, वीस सेकंद हात धुणे, हस्तांदोलन न करणे, एकमेकांपासून दूर राहाणे इत्यादी खबरदारीचे उपाय सुचविण्यात येत आहेत.
युरोप खंडातील बहुतांश देशांमध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने, करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अनेक देशांतील नागरिकांनी घरीच राहाण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी शहरं ओसांड पडली आहेत. तर, शहरं ‘लॉक डाऊन’ करण्यात आली आहेत. याचा दुसरा परिणाम असा झाला की, इंटरनेटचा वापर वाढला.
या कठीण काळात युरोपातील इंटरनेटवर ताण पडून ती कोलमडू नये म्हणून ‘नेटफ्लिक्स’ने युरोपमध्ये ‘हाय डेफिनेशन’ व्हिडिओ दाखविणे साधारण एक महिन्यासाठी थांबवले आहे. युरोपियन युनियनने नेटफ्लिक्स आणि इंटरनेट वापरणाऱ्यांना ‘हाय डेफिनेशन’ व्हिडिओ टाळण्याचे आवाहन केल्यानंतर कंपनीने ही घोषणा केली. जरी इंटरनेटच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली, तरी इंटरनेटच्या स्पिडवर सध्या विपरित परिणाम दिसून येत नसल्याचे युरोपियन कमिशनने म्हटले आहे.