र्वष सरली, पिढी पालटली; पण डेनिमचं गारूड अजूनही तरुणाईच्या मनावरून उतरलेलं नाही. अर्थात नव्या पिढीसोबत नव्या स्वरूपात डेनिम पुन्हा बाजारात येतं. यंदा त्याने सुटसुटीतपणा आणि फ्यूजन हे तरुणांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन घटक लक्षात घेऊन, स्वत:मध्ये आवश्यक बदल करून डेनिम पुन्हा बाजारात आलं आहे, ते अजून काही दशकं स्वत:ची मोहिनी कायम ठेवायच्या उद्देशाने.

१८७३चा काळ.. एका जोडगळीला एका कापडाचं पेटंट मिळालं. त्यानंतर १८९० मध्ये या कपडय़ाच्या प्रकाराचा जन्म झाला आणि आजगणिक जगभरातील आबालवृद्ध या कापडाच्या मोहजालातून बाहेर सुटू शकले नाहीत. ते कापड होतं ‘डेनिम’ आणि तो कपडय़ाचा प्रकार होता ‘लिव्हाईस’ ५०१ जीन्स पँट. तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेली आणि अगदी मेट्रो शहरापासून खेडेगावापर्यंत प्रत्येक घरात सापडणारं हे डेनिम यंदाच्या वर्षी तब्बल १४३ वर्षांचं झालं आहे. डेनिम म्हणजे पँट हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांत आपल्या मनात इतकं पक्कं बसलं आहे, की डेनिम हे कापड असून जीन्स हा कपडय़ाचा प्रकार आहे, यातही गल्लत केली जाते.

सुटसुटीत, धुण्याची कटकट नसलेली, कोणत्याही कार्यक्रमाला, दिवसाच्या कोणत्याही प्रहरी सहज वापरता येईल असा हा कपडय़ाचा प्रकार. मागच्या वर्षांपासून त्याला ‘वापरायला सोयीची नसल्याचं’ लेबल लागलं. भारतासारख्या दमट वातावरणाच्या देशात जीन्समुळे रॅश, घाम येतो, बराच वेळ घातल्यास खाज येते, असं म्हटलं गेलं आणि जीन्सला पर्याय शोधण्याची मोहीम सुरू झाली. त्यामुळे मागच्या वर्षी ड्रेसेस, स्कर्ट्सचे प्रमाण वाढून जीन्सची मागणी कमी होऊ  लागली होती; पण यंदा मात्र डेनिम नव्या स्वरूपात बाजारात परतले असून केवळ जीन्स पँटच नाही, तर जॅकेट, शर्ट, ड्रेस, स्कर्ट, जंपसूट हे प्रकारही पाहायला मिळत आहेत; पण मागच्या वेळेचा धडा घेऊन डेनिम वापरायचा सुटसुटीत करायचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सध्या बाजारात पाहायला मिळणारं डेनिम कापड आणि त्यापासून बनविलेले कपडय़ांचे प्रकार वजनाने हलके, सुटसुटीत आहेत. तुमची जुनी जीन्स आणि नुकतीच विकत घेतलेली जीन्स उदाहरण म्हणून पाहू शकता. त्यांच्यातील वजनाचा फरक लक्षात येईल.

शर्ट

मागच्या वर्षीपर्यंत कपाटातील डेनिम शर्ट ओल्ड फॅशन मानला जात होता; पण सध्या तोच शर्ट ट्रेंडमध्ये आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डीअर जिंदगी’च्या एका गाण्यात आलिया भटने डेनिम शर्ट आणि जीन्स घातलेली आहे. सध्या हे कॉम्बिनेशन ट्रेंडमध्ये आहे. ब्ल्यू शर्ट आणि डंगरी कल्पना करताना मोनोटोन वाटत असलं, तरी मस्त दिसतं. फक्त तुमचा शर्ट ढगाळ हवा. मुंबईसारख्या नावापुरता थंडी असलेल्या शहरात हा शर्ट जॅकेट म्हणून सहज वापरता येतो. सुटसुटीत असल्याने घामाची चिंता नसते.

कुर्ते

यंदाच्या सीझनमध्ये इंडिगो रंग ट्रेंडमध्ये आहे. हा रंग डेनिममध्ये महत्त्वाचा असतो. त्यामुळे सध्या बाजारात डेनिमचे कुर्ते पाहायला मिळत आहेत. प्लेन ए-लाइन, शर्ट ड्रेस स्टाइल, फ्लेअर अशा वेगवेगळ्या स्वरूपांत हे कुर्ते पाहायला मिळतात. प्रिंट्स, एम्ब्रॉयडरीचे डेनिम कुर्तेसुद्धा बाजारात आहेत. या कुर्त्यांसोबत वेगवेगळ्या रंगांची लेगिंग वापरता येते. तसेच एखादं दिवशी फक्त कुर्ता वन पीस ड्रेस स्वरूपातसुद्धा वापरता येऊ  शकतो. शर्ट ड्रेस स्टाइल कुर्ता एखाद्या टय़ुनिकवर जॅकेट म्हणूनसुद्धा वापरू शकता.

जीन्स

डेनिम म्हटल्यावर जीन्सचा विषय येणार नाही, असं शक्यच नाही. जीन्स हा शक्यतो सकाळी ऑफिस, कॉलेजला वापरली जाते. रात्री एखाद्या पार्टीसाठी मात्र ड्रेसला पसंती दिली जाते; पण अशा प्रसंगीही जीन्सप्रेमींना जीन्सची साथ सोडावीशी वाटत नाही; पण अशा वेळी प्लेन जीन्स नकोशी वाटते. हे लक्षात घेऊन सध्या जीन्सला सकाळी कॅज्युअल म्हणून आणि रात्री पार्टीत वापरता येईल अशा पद्धतीने डिझाईन करायला सुरुवात केली आहे. त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुटसुटीतपणा. दिवसभर जीन्स वापरायची म्हणजे खाज, घाम नको आणि फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून या जीन्स ढगाळ असतात. खालच्या बाजूने दोन फोल्ड मारून अँकल लेन्थ वापरता येतात. मधून कापलेल्या रीप्ड जीन्स, एम्ब्रॉयडरी किंवा प्रिंट केलेल्या जीन्स, स्टडेड जीन्स या प्रकारात येतात. या जीन्ससोबत वेळ आणि कार्यक्रमानुसार वेगवेगळे टॉप्स वापरता येतात.

डंगरी   

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डंगरी हा तसा कामगारांच्या पोशाखाचा प्रकार. थोडीशी ढगाळ, वावरायला सुटसुटीत अशी डंगरी सध्या जीन्स, स्कर्ट, ड्रेस अशा वेगवेगळ्या स्वरूपांत पाहायला मिळते. गंजी, टी-शर्ट, टय़ूब टॉप, क्रॉप टॉप, शर्टसोबत डंगरी सहज वापरता येतो. डंगरी ड्रेस एखाद्या टय़ुनिक किंवा ड्रेसवरसुद्धा घालता येतो किंवा नुसता डंगरी ड्रेससुद्धा मस्त दिसतो. डंगरीसोबत मस्त चष्मा घालून मिळणारा कुल-स्कूल लुक सध्या ट्रेंडमध्ये आहे.

कुठे मिळतील?

मुंबईच्या सर्व फॅशन स्ट्रीटपासून बडय़ा ब्रँडच्या दुकानांपर्यंत सर्वत्र हे कपडय़ांचे प्रकार उपलब्ध आहेत. तुमच्या बजेटनुसार तुम्ही खरेदी करू शकता. शॉपिंग स्ट्रीटवर यांची किंमत ५००-१००० रुपयांपर्यंत आहे, तर मॉल्समध्ये हेच कपडे २०००-५००० उपलब्ध आहेत. अर्थात त्यांच्या गुणवत्तेचा फरक आहेच.