डॉ.अमोल देशमुख

गॅजेट्स तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत चालली आहे. मोबाइलमुळे आपल्याला दैनंदिन जीवनात सहजता, माहिती देवाण-घेवाण, मनोरंजन सहजतेने उपलब्ध करून देताना मात्र प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात प्रवेश केला असून या तंत्रज्ञानावर परावलंबित्व निर्माण झाले आहे. मोबाइलच्या तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य सोपं केलं, पण त्याचा अतिवापर, अतिरेक माणूस करत असेल तर तो तंत्रज्ञानाचा दोष नाही. मोबाइलचा अतिवापर आपल्याला त्याच्या व्यसनाकडे घेऊन जात आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत मोबाइलचा अतिवापर होत आहे. लहान मुलांनी त्रास देऊ  नये किंवा जेवण करावे म्हणून जन्मत:च त्याच्यासमोर मोबाइल दाखवला जातोय किंवा सेल्फी काढता काढता अपघात झाला अशाही घटना मोबाइल अतिवापराने समोर येत आहेत. मोबाइलच्या अतिवापराने बऱ्याच शारीरिक तसेच मानसिक समस्या दिसून येत आहेत. शारीरिक परिमाणामध्ये मोबाइल मेंदू, कान, डोळे, हृदय, मान यांवर तीव्रतेने परिणाम करत आहे. मानसिक समस्यांमध्ये प्रामुख्याने डोकेदुखी, नैराश्य, चिंता, झोपेच्या समस्या, वैवाहिक समस्या, नातेसंबंधांतील समस्या, लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, शैक्षणिक अधोगती दिसून येत आहे.

जर मोबाइलमुळे वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक व्यवहार बिघडून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत असेल तसेच अतिवापराचे दुष्परिणाम माहीत असूनसुद्धा मोबाइलचा अतिवापर होत असेल तर मोबाइलचे व्यसन जडले आहे, असे आपण म्हणू शकतो. इंटरनेट सर्फिग, चॅटिंग करणे, गेम खेळणे, चित्रफिती बघणे, फोन करणे, छायाचित्र काढणे अशी मोबाइल अतिवापराची कारणं आहेत.

प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याची कला हरवत चालली आहे. समोरासमोर संवाद कमी होत चालला आहे. मोबाइलमुळे शेजारी बसलेल्या माणसाशी बोलणं एखाद्याला नकोस वाटतं. मोबाइलवर पॉर्न बघण्याची सवय तरुणांमध्ये खूप आहे. अतिपॉर्न बघितल्याने जोडीदाराकडून अवास्तव लैंगिक अपेक्षा केल्या जातात. त्यामुळे जोडीदाराबद्दलचं आकर्षण कमी होत जातं आणि वैवाहिक कलह वाढत जातात.

मोबाइलचा अतिवापर थांबवणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना राबवता येतील. उदा. जेव्हा गरज असेल तेव्हाच मोबाइल वापरा, मोबाइलवर बोलताना मोजकेच बोला, कुटुंबासोबत असताना मोबाइल वापरणे टाळा, कुटुंबातील सदस्यांनी मोबाइल वापराबाबत काही नियम पाळायला हवेत. जसे की जेवताना, खेळताना किंवा महत्त्वाच्या गोष्टी करताना मोबाइल दूर असू द्या, मोबाइल रिचार्ज करताना स्पेशल पॅकेज घेण्याचे टाळा, मोबाइलव्यतिरिक्त इतर छंद, मैदानी खेळ, गायन इत्यादी बाबी उपयोगी ठरतील. दिवसातला काही वेळ फोन किंवा इंटरनेट बंद ठेवा, दिवसातील ठरावीक वेळा मोबाइल वापरासाठी ठरवा आणि त्या वेळेस मोबाइल वापर करून घ्या, झोपेच्या ठिकाणी मोबाइल वापरणे टाळा, मोबाइल नोटिफिकेशन बंद ठेवा म्हणजे वारंवार त्याकडे लक्ष जाणार नाही. मुलांच्या मोबाइल वापराकडे पालकांनी प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं. मुलं जेवताना पालकांनी त्याच्या हातात मोबाइल द्यायलाच नको. मूल रडायला लागलं की त्याला शांत करण्यासाठी मोबाइल दिला जातो. हे करणं अत्यंत अहितकारक आहे. जरा वेळ त्याला त्रास होऊ द्या. मुलांना अशा प्रकारे थोडा त्रास झाला तर काही बिघडत नाही. मोबाइलचा अतिवापर होत असेल आणि तो तुम्हाला नियंत्रणात आणता येत नसेल तर मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक यांची मदत घ्या.