Diwali Faral Recipes In Marathi : दररोज ऑफिसवरून येऊन मग घरच काम आणि त्यात दिवाळीचा फराळ यांचा ताळमेळ कसा जुळवायचा आपल्याला प्रश्नच पडतो. पण, फराळ बनवणेही तितकेच महत्वाचे असते. तर वेळ कमी असेल आणि यंदा हटके काही तरी तुम्हाला बनवायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास ३ रेसिपी घेऊन आलो आहोत.
१. फराळातील सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे ‘लाडू.’ तर सगळ्यात पहिला आपण चवीला चवीला वेगळा आणि खास पारंपरिक ‘शेव लाडू’ या पदार्थाची रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य
- एक किलो बेसन पीठ (जाडसर दळून घ्यायचं)
- एक किलो साखर
- मीठ
- हळद
- पाणी
- वेलची पावडर
- काजू, बदाम, मनुके
- साच्यात शेवाचे पान लावून घ्या.
कृती
- परातीत बेसनचं पीठ घ्या
- त्यात मीठ, हळद आणि थोडं चमचाभर तेल घेऊन पिठात मिक्स करा आणि नरम मळून घ्या.
- अर्धा तास पीठ तसंच ठेवा.
- कढईत तेल गरम करायला ठेवा.
- साचा घेऊन त्यामध्ये शेव बनवण्याचे पान लावून घ्या आणि त्यात मळून घेतलेलं पीठ घाला आणि साच्याच्या सहाय्याने तेलात शेव पाडून घ्या व शेव दोन्ही बाजूने नरम भाजून घ्या.
- शेव दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतल्यावर झाऱ्याच्या सहाय्याने शेव बाहेर काढा आणि एका परातीत काढून घ्या. तुम्ही हाताने किंवा मिक्सरनेसुद्धा शेवेला कुस्करून घेऊ शकता.
- (टीप : जर तुम्हाला हाताने शेव कुस्करून घ्यायची असेल तर ती तेलातून काढल्यानंतर लगेच कुस्करून घ्या आणि जर मिक्सरमध्ये शेव बारीक करणार असाल, तर सर्व शेव तळून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.)
- त्यानंतर पाक बनवून घ्या.
- गॅसवर टोप ठेवा आणि त्यात एक ग्लास पाणी आणि एक किलो साखर पाक तयार होईपर्यंत मिश्रण हलवत राहा. पाक तयार झाला की त्याच्यावरून वेलची पावडर, काजू, बदाम, मनुके टाका आणि सगळ्यात शेवटी कुस्करून घेतलेली शेव त्यामध्ये घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
- मिश्रण थोडं थंड झाल्यावर लाडू वळून घ्या.
- अशा प्रकारे तुमचे ‘शेव लाडू’ तयार.
२. त्यानंतर फराळातील दुसरा आवडीचा पदार्थ म्हणजे ‘चकली’.
तुम्ही दरवर्षी एकाच पद्धतीची चकली खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला ‘पोह्यांच्या चकल्या’ कशी बनवायची हे सांगणार आहोत.
साहित्य
- एक वाटी तांदळाचे पीठ
- एक वाटी पोहे
- एक वाटी भाजलेली चण्याची डाळ
- पांढरे तिळ
- हळद
- मसाला
- ओवा
- तेल
- पाणी
- मीठ
कृती
- पोहे मिक्सरला बारीक करुन घ्या आणि मग चाळून घ्या.
- नंतर अर्धी वाटी भाजलेली चण्याची डाळ मिक्सरला बारीक करुन चाळून घ्या.
- त्यानंतर तांदळाचे पीठ चाळून घ्या.
- हे सगळं मिक्स करुन घ्या.
- दुसरीकडे एक वाटी पाणी उकळवून घ्या.
- पाण्याला उकळी आली की, मीठ, हळद, मसाला, ओवा, पांढरे ति, एक छोटा चमचा तेल त्यात घाला.
- त्यानंतर उकळलेल्या पाण्यात मिक्स करुन घेतलेलं पिठ टाका.
- थोडं हलवून घ्या आणि पाच मिनिटे तसचं ठेवून द्या.
- नंतर पीठ मळून घ्या आणि चकल्या करायला घ्या.
- अशाप्रकारे तुमच्या पोह्यांची चकली तयार.
३. तिसरा पदार्थ म्हणजे “मखमल पुरी.”
दिवाळीत एखादा अनोखा गोड पदार्थ बनवण्याचा तुम्ही नक्कीच विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका खास पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत, ज्याचं नाव आहे “मखमल पुरी.” हा पदार्थ तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि तुमच्या फराळात याचा समावेश करा आणि कुटुंबाबरोबर हा पदार्थ इतरांना देऊन त्यांचे तोंड गोड करा.
साहित्य
- अर्धा किलो मैदा
- दोन वाटी बारीक किसलेलं खोबर
- अर्धा किलो साखर
- फूड कलर (पिठानुसार – अर्धा चमचा)
- तेल
- मीठ
- वेलची पूड (अर्धा चमचा)
कृती
- सगळ्यात आधी अर्धा किलो मैदा चाळणीमधून चाळून घ्या.
- गॅसवर एका भांड्यात अर्धी वाटी तेल गरम करून घ्या.
- परातीत मैदा घेऊन गरम करून घेतलेलं तेल त्यामध्ये टाका आणि तेल टाकल्यावर मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर पीठ मळून घ्या व चवीनुसार थोडं मीठ घाला.
- चमचाभर पाण्यात फूड कलर (Food Colour) मिक्स करा आणि मग ते पिठात टाकून आणि मळून घ्या. त्यानंतर १५ मिनिटे किंवा अर्धा तास पीठ झाकून ठेवा. (फूड कलरमध्ये तुम्ही भगवा किंवा पिवळा रंग वापरू शकता)
- पीठ मळून झाल्यावर सगळ्यात आधी पाक तयार करून घ्या.
- गॅसवर टोप ठेवून त्यात दीड ग्लास पाणी, दोन वाटी साखर टाकून पाक तयार होईपर्यंत चमच्याने हलवत रहावे.
- (टीप : जेवढा पाक चांगला होईल तेवढ्या पुऱ्या चविष्ट लागतात) पाक तयार झाला आहे का, तपासावे आणि गॅस बंद करावा आणि वरून वेलची पूड टाकावी.
- त्यानंतर पिठाचे गोळे करून छोट्या-छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
- नंतर गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवा आणि पुरी तळायला सुरुवात करा आणि तळताना पुरी जेव्हा नरम असते, तेव्हा चमच्याच्या सहाय्याने दुमडून घ्या आणि नंतर पुरी दोन्ही बाजूने कडक तळून झाल्यावर झाऱ्याच्या सहाय्याने तेलातून बाहेर काढा.
- सगळ्या पुऱ्या तळून झाल्यावर पाकात बुडवून घ्या आणि त्यावर लगेच बारीक किसलेलं खोबरं आणि साखर घाला.
- अशाप्रकारे तुमची ‘मखमल पुरी’ तयार.
तर अशाप्रकारे परंपरा जपून, नवीन पद्धतीने पदार्थ बनवून, कामाचा तोल सांभाळून असा दिवाळीचा फराळ शकक बनवू शकणार आहात…