दिवाळी हा आनंद, उत्साह व प्रकाशाचा सण आहे. सणात घर, ऑफिस आणि इतर ठिकाणी सजावट, खरेदी आणि मेकअपच्या तयारीत आपण स्वतःची काळजी घ्यायला बर्याचदा विसरतो. त्याचबरोबर तळलेले पदार्थ, मिठाई आणि गोड खाण्यामुळे, तसेच सतत धावपळ केल्यामुळे त्वचा निस्तेज, थकीत आणि कोरडी दिसू लागते. त्यामुळे या दिवाळीत फक्त घर सजवण्यावर लक्ष न देता, आपल्या त्वचेची काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. येथे आम्ही तुम्हाला ५ सोपे आणि प्रभावी उपाय सांगत आहोत, ज्यामुळे दिवाळीच्या सणात त्वचा नैसर्गिकपणे चमकदार दिसेल.
१. भरपूर पाणी प्या
त्वचा तजेलदार आणि चमकदार राहावी म्हणून रोज कमीत कमी ८-१० ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे. पाणी त्वचेला आतून पोषण देते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत होते. त्याशिवाय नारळ पाणी, ग्रीन टी व फळांचा रस पिणेदेखील फायद्याचे आहे आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
२. त्वचेची योग्य काळजी घ्या
दिवाळीत जास्त मेकअप केला जात असल्याने त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोज मॉइश्चरायझर लावा आणि रात्री झोपण्याआधी चेहरा नीट साफ करा. तुम्ही घरच्या घरी फेस पॅकदेखील लावू शकता. फेस पॅक त्वचेतील जुन्या पेशी काढून टाकतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतो.
३. आरोग्यदायी आहार घ्या
जास्त तळलेल्या, मसालेदार किंवा गोड पदार्थांचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो. त्याऐवजी फळे, हिरव्या भाज्या, नट्स आणि व्हिटॅमिन सी व ई असलेले पदार्थ खा. त्यामुळे त्वचा तजेलदार, मजबूत आणि नैसर्गिकपणे चमकदार दिसते.
४. पुरेशी झोप घ्या
जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही, तर तुमची त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसेल. दररोज ७-८ तासांची चांगली झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. झोपेत त्वचा स्वतःला दुरुस्त करते आणि नवीन पेशी तयार करते, ज्यामुळे चेहरा ताजातवाना आणि चमकदार दिसतो.
५. घरच्या घरी फेस पॅक लावा
दिवाळीत घरच्या घरी नैसर्गिक फेस पॅक तयार करून वापरणे खूप सोपे आहे. दूध व हळद किंवा दही व बेसन यांचे पॅक त्वचेला नैसर्गिक चमक देतात. चेहऱ्यावर हलका मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा अधिक तजेलदार दिसते.
या ५ सोप्या टिप्स फॉलो केल्यास दिवाळीत तुमची त्वचा नैसर्गिकपणे चमकदार, हायड्रेटेड व तजेलदार राहील. सणाचा आनंद घेताना स्वतःच्या त्वचेची काळजी घेणे विसरू नका आणि दिवाळी सुंदर, चमकदार त्वचेसोबत साजरी करा.