Early Signs of Kidney Failure: मूत्रपिंड (किडनी) हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्त शुद्ध करण्यापासून ते पाण्याचे प्रमाण नियंत्रित करण्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कार्ये पार पाडतो. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंड महत्त्वाचे काम करत असते. खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रुपांतर होते, हे रक्त योग्य पद्धतीने घुसळून संपूर्ण शरीराला पोहचविणे आणि त्यातील अनावश्यक घटक मलमूत्राच्या माध्यमातून बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंड अविरत कार्य करत असते. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारख्या खनिजांचं प्रमाण योग्य राखणं ही सर्व जबाबदारी मूत्रपिंडांची असते. पण, जर या मूत्रपिंडांचं कामकाज बिघडलं तर शरीरात हळूहळू विष जमा होऊ लागतं आणि हेच पुढे मूत्रपिंड खराब होण्याचं कारण ठरू शकतं.
अनेकदा लोकांना मूत्रपिंड आजाराची लक्षणं उशिरा समजतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते काही लवकर दिसणारी ८ लक्षणं अशी असतात, जी वेळेत ओळखली तर मोठं नुकसान टाळता येतं.
डॉक्टरांचा इशारा नेफ्रोप्लसचे सल्लागार नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. सोनुसिंग पाटील सांगतात, “दरवर्षी एकदा तरी eGFR (estimated glomerular filtration rate) आणि UACR (urine albumin-to-creatinine ratio) ही चाचणी करावी. लवकर निदान झाल्यास आजाराचा वेग मंदावू शकतो आणि योग्य उपचारांमुळे मूत्रपिंड खराब होण्याचा धोका १५ वर्षांपर्यंत टाळता येऊ शकतो.”
ते पुढे म्हणतात, “मूत्रपिंडाच्या आजाराचं लवकर निदान झालं तर त्यावर नियंत्रण ठेवता येतं. वेळेत उपचार घेतल्यास अनेकदा डायालिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची गरज पडत नाही.”
शरीर देतंय असे संकेत
१. अतिशय थकवा आणि अशक्तपणा: शरीरात विषारी पदार्थ साचल्याने थकवा वाढतो. मूत्रपिंड आजारामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन अॅनिमिया होऊ शकतो.
२. लघवीत बदल : वारंवार लघवी लागणे, विशेषतः रात्री; लघवीचा रंग गडद तपकिरी किंवा फेसाळ; कधी कधी रक्त दिसणे हे संकेत दुर्लक्षित करू नका.
३. पाय, टाच आणि चेहऱ्यावर सूज : मूत्रपिंडाचे काम नीट न झाल्यास सोडियम साचतो आणि त्यामुळे सूज येते.
४. डोळ्यांखाली पफीनेस : मूत्रमार्गातील प्रथिनं जाण्यामुळे डोळ्यांभोवती सूज दिसते.
५. त्वचेवर खाज : शरीरात अपायकारक पदार्थ साचल्याने पाय, हात आणि पाठीवर तीव्र खाज सुटते.
६. भूक न लागणे, उलट्या होणे : शरीरातील विषारी घटक वाढल्याने पचनावर परिणाम होतो आणि भूक मंदावते.
७. वजन घटणे : सततचा अशक्तपणा आणि भूक मंदावल्याने वजन कमी होऊ शकतं.
८.वस्नायूंना आकडी येणे : कॅल्शियम-पोटॅशियमचे प्रमाण बिघडल्याने स्नायूंचं कामकाज अडखळतं आणि आकडी येते.
वेळेत काळजी घ्या
डॉ. पाटील सांगतात, “लवकर निदान, योग्य आहार, पुरेशी पाणी पिण्याची सवय आणि नियमित तपासण्या केल्यास मूत्रपिंडाचे आरोग्य दीर्घकाळ टिकवता येऊ शकते.”
थोडक्यात, शरीरातील ही ८ संकेतं म्हणजे फक्त लक्षणं नाहीत, तर आतल्या मोठ्या आजाराचा इशारा आहेत! त्यांना दुर्लक्ष केलं तर एक दिवस मूत्रपिंड पूर्णपणे निकामी होऊ शकते… म्हणून सावधान व्हा आणि वेळेत तपासणी करा!