Early Signs of Oral Cancer: कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. मागील काही वर्षांपासून भारतात तोंडाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तोंडाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, जो वेळीच ओळखल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण, अनेकदा लोक तोंडातील सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे आजार गंभीर टप्प्यात पोहोचतो. तोंडात अधूनमधून फोड येणे ही सामान्य बाब आहे. कधी अन्नातील संवेदनशीलता, कधी पोषक घटकांची कमतरता, तर कधी जीवाणूंमुळे हे फोड दिसू शकतात. मात्र, हे फोड किंवा डाग बराच काळ टिकून राहिले तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका, कारण हे फक्त साधे फोड नसून तोंडाच्या कर्करोगाचे धोकादायक लक्षण असू शकते.
तोंडाचा कर्करोग म्हणजे काय?
तोंडाचा कर्करोग हा एक प्रकारचा कर्करोग आहे, जो तोंडाच्या किंवा घशाच्या ऊतींमध्ये तयार होतो. तो जीभ, टॉन्सिल, हिरड्या आणि तोंडातील इतर विविध भागांवर परिणाम करतो. तोंडाचा कर्करोग हा एक गंभीर रोग आहे, जो अनेक घटकांमुळे होऊ शकतो, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तंबाखूचा वापर आहे. तोंडातील कर्करोग तेव्हा होतो, जेव्हा ओठांतील किंवा तोंडातील पेशी अनियंत्रित वाढ करू लागतात. मेयो क्लिनिकच्या मते, हा कर्करोग साधारणपणे स्क्वैमस सेल्समध्ये सुरू होतो. हे सेल्स आपल्या ओठांच्या व तोंडाच्या आतल्या पातळ थरांमध्ये असतात. यातील DNA मध्ये बिघाड झाल्यास पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढू लागतात आणि तिथूनच कर्करोगाला सुरुवात होते.
कोणते भाग प्रभावित होतात?
यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस (NHS) नुसार, तोंडाचा कर्करोग फक्त जीभ किंवा ओठांपुरता मर्यादित नसतो. तो मसूड्यांच्या पृष्ठभागावर, लाळग्रंथींमध्ये, टॉन्सिल्समध्ये किंवा घशातसुद्धा होऊ शकतो. म्हणजे तोंडाच्या एका कोपऱ्यात सुरुवात होऊन संपूर्ण तोंडाच्या आतल्या भागाला आणि श्वासनलिकेपर्यंत हा कर्करोग पसरू शकतो.
तोंडाच्या कर्करोगाची महत्त्वाची लक्षणे
- आठवडे उलटून गेले तरीही न बऱ्या होणाऱ्या जखमा किंवा फोड
- सतत सैल होणारे दात किंवा काढल्यानंतर नीट न भरणारे सॉकेट
- तोंडात कायमस्वरूपी सुन्नपणा जाणवणे
- जीभ किंवा तोंडाच्या आतील भागावर पांढरे किंवा लाल ठिपके दिसणे
डॉक्टरांकडे का जावं?
तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अनेकदा साधी दातदुखी, छाले किंवा लहान संसर्गाशी गल्लत केली जातात. पण, वेळेत तपासणी केल्यास हा आजार ५०% ते ९०% पर्यंत टाळता येतो, असं NHS चं मत आहे.
धोका कमी करण्याचे उपाय
मेयो क्लिनिकनुसार –
- तंबाखू व धूम्रपान पूर्णपणे सोडा
- दारूचे सेवन मर्यादित करा
- ओठांना थेट सूर्यप्रकाशापासून वाचवा
- नियमितपणे दंत तपासणी करा
लक्षात ठेवा, जर तुमच्या तोंडात जीभेवर, मसुड्यांवर, ओठांवर किंवा गालाच्या आतल्या बाजूला लाल-पांढरे ठिपके किंवा न बरे होणारे फोड दिसले तर ते कर्करोगाचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जीवन वाचवा.