अनेकांच्या घरात हल्ली फॅनसह, एसी किंवा कूलरचा वापर केला जातो. विशेषत: उन्हाळ्यात अनेकजण कूलरचा वापर करतात. पण, हा कूलर नियमित साफ करणे फार महत्वाचे असते; कारण वेळेवर कूलर साफ न केल्यास यातून अतिशय घाणेरडा, कुबट वास येऊ लागतो. अशावेळी कूलरमधील दुर्गंधी कशी दूर करायची हे समजत नाही. यामुळे कुबट वास घरभर पसरतो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला कोणतीही मेहनत आणि पैसा खर्च न करता कूलरमधून येणारा कुबट, दुर्गंधीयुक्त वास घालवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही कूलरमधील कुबट वास घालवून ताजी, थंडी आणि स्वच्छ हवा मिळवू शकता.
कूलरमधून कुबट वास का येतो?
कूलर वेळेवर साफ न केल्यास त्यातून दुर्गंधी येऊ लागते. बाहेरील धूळ आणि आद्रता हे देखील कूलरमधून दुर्गंधी येण्यामागचे कारण आहे. यासाठी दर आठवड्याला कूलरमधील पाणी स्वच्छ करावे लागते.
याशिवाय कूलर नियमित साफ न केल्यास त्यातील पाण्यात किडेही वाढू लागतात. यामुळे पाण्याला अतिशय घाण वास येऊ लागतो. यामुळे दर आठवड्याला कूलर साफ करा.
१) कडुनिंबाची पानं
कडुलिंबाची पाने दुर्गंधी आणि बॅक्टेरिया या दोन्हींचा नायनाट करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. जर तुमच्या कूलरमधून कुजलेला वास येत असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. यासाठी कडुलिंबाची पाने थोडी कुटून सुती कापडात बांधून ठेवा. यानंतर कापडाची ही पोटली कूलरच्या पाण्यात ठेवा, असे केल्याने पाण्याला दुर्गंधी येणार नाही आणि कीटकांची पैदासही होणार नाही. पण, दर ३-४ दिवसांनी कडुलिंबाची पाने बदलावी लागतील.
२) संत्र्याची साल
संत्र्याची साल कचऱ्यात फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याचा वापर कूलरमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी वापरू शकता. यासाठी संत्र्याची साल उन्हात कडकडीत सुकवा आणि तिची बारीक पावडर तयार करा. यात तुम्ही दालचिनी पावडरही मिक्स करू शकता. आता ही तयार पावडर तुम्ही कूलरच्या आत शिंपडा किंवा पाण्यात मिक्स करून स्प्रे करा. यामुळे कुबट वास पसरणार नाही.
३) बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा किचनमधील सफाईसाठी खूप प्रभावी उपाय मानला जातो. याचा वापर तुम्ही कूलरमधील दुर्गंधी दूर करण्यासाठीही करू शकता, यासाठी कूलरच्या पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करा, यामुळे कूलरमधील कुबट वास काही मिनिटांत दूर होईल. पण, यासाठी कूलरमधील पाणी सतत बदलत राहावे लागेल.