एक जोडपं त्यांच्या तीन मुलांना घेऊन हॉटेलमध्ये गेलं. अनेक महिने त्यांनी घरात काढले होते. आज मुक्त वातावरणात, आवडत्या खाद्य-पदार्थांचा आस्वाद घेता येणार असल्याने ते कुटुंब आनंदी होतं. त्यांनी वेगवेगळया खाद्य पदार्थांची ऑर्डर दिली. हास्य, विनोद गप्पांमध्ये रमलेल्या त्या कुटुंबाने सर्व रुचकर पदार्थांचा आस्वाद घेतला . त्यांनी ऑर्डर केलेल्या खाद्य-पदार्थांचं बिल १०० पाऊंडस झालं होतं. पण वेटर बिल घ्यायला आला, तेव्हा त्याने त्या कुटुंबाला फक्त ५० पाऊंडसचं बिल भरायला सांगितलं. कारण त्या कुटुंबाच उर्वरित ५० पाऊंडसचं बिल यूके सरकार भरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये इतके महिने लॉकडाउन होता. या काळात तिथे हॉटेल व्यवसाय कोलमडून पडला आहे. या उद्योगाला सावरण्यासाठी यूकेचे चान्सलर ऋषि सनक यांनी ‘इट आऊट टू हेल्प आऊट’ ही अभिनव योजना आणली आहे. यूकेमधील ५३ हजारपेक्षा जास्त हॉटेल्स आणि कॅफेसना याचा फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत नागरिकांचे हॉटेलमधील खानपानाचे ५० टक्के बिल सरकार भरणार आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

‘इट आऊट टू हेल्प आऊट’ या योजनेतंर्गत संपूर्ण ऑगस्ट महिन्यात सोमवार ते बुधवारपर्यंत खाद्यपदार्थ आणि मद्याव्यतिरिक्त अन्य पेयांवर ५० टक्के सवलतीपासून प्रतिव्यक्ती १० पाऊंडापर्यंत सवलत मिळणार आहे. पार्सलधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

“आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये हॉटेल्स, कॅफे आणि बार खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. दहालाखापेक्षा जास्त लोक या उद्योगात काम करतात. त्यांना करोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व पावले उचलू” असे ऋषि सनक यांनी सांगितले. जास्तीत जास्त ग्राहकांनी हॉटेसमध्ये यावे आणि या क्षेत्रातला रोजगार टिकून रहावा यासाठी यूके सरकारने ही अभिनव योजना आणली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat out to help out uk govt to pay 50 of food bills from today dmp
First published on: 01-08-2020 at 13:58 IST