हृदय आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयव आहे. शरीरभर रक्ताभिसरणाची जबाबदारी त्याच्यावर असते. मात्र, हृदयात समस्या निर्माण झाल्यास धडधड वाढणे, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना किंवा लवकर थकवा अशा लक्षणांचा अनुभव येऊ शकतो. सुरुवातीला ही लक्षणे सौम्य असली तरी योग्य वेळी तपासणी न झाल्यास गंभीर हृदयविकार उद्भवू शकतात. त्यामुळे दीर्घकाळ असे लक्षण जाणवत असल्यास डॉक्टर प्रामुख्याने ईसीजी (Electrocardiogram) तपासणीचा सल्ला देतात.

ईसीजीने हृदयातील ब्लॉकेज कळते का?

ईसीजीद्वारे हृदयातील इलेक्ट्रिक क्रिया व रिदमची माहिती मिळते. पूर्वी झालेल्या हृदयविकाराचा झटका किंवा रिदममधील बिघाड ओळखता येतो. पण हृदयातील ब्लॉकेज, वाढलेले एलडीएल कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसराइडची माहिती ईसीजी देऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर कार्डियाक सर्जन डॉ. रमाकांत पांडा यांनी एका पॉडकास्टमध्ये दिले.

त्यांच्या मते, “हृदयविकार ओळखण्यासाठी ईसीजी हा सर्वात कमी उपयुक्त टेस्ट आहे. ईसीजी फक्त त्या वेळी बदल दाखवतो, जेव्हा रुग्णाला वेदना होत असतात किंवा पूर्वी हार्ट अटॅक झाला असेल. पण गंभीर ब्लॉकेज असूनही जर वेदना नसेल तर ईसीजी काहीच दाखवणार नाही.”

डॉ. सौम्या शेखर जेनेसामंत यांनीही हेच मत व्यक्त केले. त्यांच्यानुसार, ईसीजी हृदयातील रिदममधील गडबड किंवा पूर्वीचा हार्ट अटॅक दर्शवतो. मात्र, रुग्णाला त्या क्षणी त्रास नसल्यास रक्तप्रवाहातील अडथळा तो दाखवू शकत नाही.

स्ट्रेस टेस्ट आणि ट्रेडमिल टेस्ट काय सांगतात?

स्ट्रेस टेस्ट, ज्याला ट्रेडमिल टेस्ट (TMT) म्हणतात, हृदयाची कार्यक्षमता शारीरिक क्रियाशीलतेदरम्यान तपासते. ग्लेनीगल्स हॉस्पिटल, मुंबईचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल गुप्ता सांगतात, “ईसीजी जिथे आरामाच्या अवस्थेत हृदयाची नोंद करतो, तिथे स्ट्रेस टेस्ट शरीराला अधिक काम करावे लागल्यावर हृदय कसे प्रतिसाद देते हे दाखवते.”

साधारणपणे ही चाचणी ट्रेडमिलवर चालणे किंवा स्टेशनरी सायकल चालवताना केली जाते. कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज असल्यास हृदयाच्या स्नायूंना रक्तप्रवाह कमी मिळतो आणि परिणामी ईसीजीत बदल, छातीत वेदना, श्वास लागणे किंवा थकवा असे संकेत दिसतात. त्यामुळे ही तपासणी अशा समस्यांचा शोध घेते, ज्या शांत अवस्थेत दिसत नाहीत.

कोणाला स्ट्रेस टेस्ट गरजेची?

डॉ. गुप्ता यांच्या मते, डायबिटीज, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, धूम्रपानाची सवय किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींनी स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी. व्यायामाच्या वेळी छातीत वेदना किंवा श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी ही तपासणी उपयुक्त आहे. तसेच मोठ्या शस्त्रक्रियांच्या आधी किंवा खेळाडूंसाठी हृदयाची स्थिती जाणून घेण्यासाठीही डॉक्टर हा टेस्ट सुचवतात.

तथापि, डॉ. गुप्ता सावध करतात की ही तपासणी परिपूर्ण नाही. कधी कधी सुरुवातीचा आजार लक्षात येत नाही किंवा निरोगी हृदयातही चुकून असामान्य परिणाम दाखवते. म्हणूनच ही तपासणी इतर चाचण्यांबरोबर एकत्रित केल्यास अधिक स्पष्ट चित्र मिळते.