How to use Egg shells: भाज्या, फळे खाताना अनेकदा त्याच्या साली फेकून दिल्या जातात. मात्र, या साली झाडांसाठी खूप फायदेशीर असतात. कारण त्यात वेगवेगळी जीवनसत्त्वे असतात. असंच अंड्यांच्या बाबतीतही आहे. अंड्याचे पदार्थ केल्यानंतर त्याच्या कवचाचे तुकडे तुम्ही कचऱ्यात टाकून देता का? पण तुम्हाला हे माहीत आहे का की तुम्ही अंड्याच्या कवचाचा वापर अनेक प्रकारे करू शकता. अंड्याचं कवच हे कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोतच नाही, तर त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये सल्फर, झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम, तांबे, मँगनीज यासारखे घटकदेखील आढळतात. अंड्याच्या या कवचाचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊ…

अंड्याच्या कवचाचा वापर

अंड्याच्या कवचाची पावडर तयार करण्यासाठी सर्वात आधी ती स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ती व्यवस्थित कोरडी करून उन्हात सुकवून घ्या. नंतर बारिक ठेचून त्याची पावडर तयार करा.

फेस पॅक बनवण्यासाठी

अंड्याच्या कवचापासून फेसपॅकही तयार करू शकता. यासाठी एक चमचा अंड्याच्या कवचाच्या पावडरमध्ये मध मिसळा आणि ती चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी ती धुवून टाका. यामुळे त्वचा चमकदार होते. तसंच सुरकुत्या, मुरूम याचा त्रास कमी होतो. शिवाय तुम्ही एक चमचा दूध, एक चमचा मध, अर्धा चमचा बेसन, झेंडूच्या फुलाचा रस असा फेसपॅक तयार करून लावल्यास चेहरा तजेलदार दिसतो.

हेअर पॅक तयार करण्यासाठी

अंड्याच्या कवचांचा उपयोग हेअर पॅक तयार करण्यासाठीदेखील होतो. यासाठी अंड्याच्या कवचात घट्ट दही मिसळा. केसांच्या मूळांपासून टोकांपर्यंत हे मिश्रण लावा. केस धुतल्यानंतर तुमच्या केसांना एक वेगळीच चमक येईल.

अंड्याच्या कवचापासून खत

अंड्याचे कवच फेकून देण्याऐवजी त्याच्यापासून खत तयार करता येऊ शकते. कारण यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. ते झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी तुम्हाला हे अंड्याचे कवच व्यवस्थित बारीक करून झाडात टाकायचे आहेत.