Fatty Liver Natural Remedies: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत फॅटी लिव्हर हा शांतपणे वाढणारा धोकादायक आजार ठरत चालला आहे. यकृतातील चरबी वाढणे हीदेखील एक समस्या आहे. जेव्हा यकृतामध्ये चरबी जमा होते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, अनियमित झोप व सततचा ताण यांमुळे लिव्हरमध्ये चरबी साचते आणि त्यामुळे हळूहळू गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. पण, जर तुम्हाला असं वाटत असेल की, लिव्हर एकदा खराब झालं, तर ते पुन्हा बरं होऊच शकत नाही, तर ती समजूत चुकीची आहे.

त्यावर मेटाबॉलिक डॉक्टर व स्पोर्टस् फिजिओ डॉ. सुधांशु राय यांनी उपाय सांगितले आहेत. त्यांचं म्हणणं आहे, “लिव्हर हा शरीरातील एकमेव असा अवयव आहे, ज्याला स्वतःला पुन्हा निर्माण करण्याची अदभुत क्षमता आहे. फक्त योग्य सवयी अंगीकारल्या, तर २८ दिवसांत यकृतातील चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते.

डॉ. राय यांनी सांगितलेले सात सोपे, पण प्रभावी दैनंदिन उपाय लिव्हरला नैसर्गिकरीत्या डिटॉक्स करून त्याची कार्यक्षमता वाढवतात. लिंबूपाणी पिण्यापासून डँडेलियन चहा, हळदी-मिरीच्या जादुई जोडीपासून पुरेशी झोप घेण्यापर्यंतचे हे उपाय पाळले, तर लिव्हरवर साचलेली चरबी नाहीशी होऊन लिव्हर पुन्हा आरोग्यदायी व मजबूत होऊ शकतं.

लिव्हरमधली घाण व फॅट्स नैसर्गिकरीत्या कमी होईल; ‘हे’ ७ उपाय ठरतील रामबाण

१. सकाळची सुरुवात गरम लिंबूपाण्याने

लिंबात व्हिटॅमिन सी आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराला हायड्रेट ठेवतातच; पण लिव्हरची सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. दररोज सकाळी उपाशीपोटी गरम लिंबूपाणी प्यायलं, तर लिव्हर डिटॉक्स होण्यास चालना मिळते.

२. हळद आणि मिरीचं जादुई मिश्रण

हळदीतील कर्क्युमिन हे नैसर्गिक औषधासारखं काम करतं. त्यामुळे लिव्हरमधील चरबी कमी होते आणि सूज व ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आटोक्यात राहतो. काळी मिरी एकत्र घेतल्यास त्याचा परिणाम दुपटीने वाढतो.

३. प्रत्येक जेवणात लीन प्रोटीन

चिकन, मासे, डाळी, अंडी, टोफू किंवा लो-फॅट दूध यांसारख्या प्रोटीनच्या स्त्रोतांचा आहारात समावेश केला, तर लिव्हरमधील चरबी झपाट्याने कमी होते. प्रोटीन इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारतं आणि लिव्हर सेल्सची दुरुस्ती करते.

४. दिवसातून दोनदा डँडेलियन चहा

डँडेलियन चहा चहा हा अँटिऑक्सिडंट्स आणि जैव सक्रिय घटकांनी भरलेला असतो. हा चहा लिव्हरला नैसर्गिकरीित्या डिटॉक्स करतो, सूज कमी करतो आणि चरबी साचू देत नाही.

५. दररोज क्रुसीफेरस भाज्या

ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी, केल या भाज्या लिव्हरचं आरोग्य जपण्यासाठी अमृतासमान आहेत. त्यातील घटक लिव्हरमधील चरबी व सूज कमी करून, त्याची कार्यक्षमता वाढवतात.

६. रिफाइंड धान्याऐवजी क्विनोआ

क्विनोआ हे हाय-प्रोटीन आणि लो-कार्ब अन्न आहे. ते अतिरिक्त चरबी साचू देत नाही, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करतं आणि लिव्हर हलकं ठेवतं.

७. आठ तासांची झोप

झोप ही केवळ आरामासाठी नाही, तर लिव्हरच्या दुरुस्ती व डिटॉक्ससाठीही अनिवार्य आहे. पुरेशी झोप घेतल्यास शरीरातील मेटाबॉलिझम सुरळीत राहतो आणि फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो.

या सगळ्या उपायांचा रोजच्या आयुष्यात समावेश केला, तर फॅटी लिव्हरचा धोका कमी होईलच; पण लिव्हर पुन्हा ताजंतवानंही होईल.